Arjun Tendulkar Troll : अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवरून गदारोळ, शाहिद आफ्रिदीचं नाव चर्चेत | पुढारी

Arjun Tendulkar Troll : अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवरून गदारोळ, शाहिद आफ्रिदीचं नाव चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : Arjun Tendulkar Troll : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रविवारी केकेआरविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले तेव्हा सोशल मीडियावर ट्विटचा पूर आला होता. प्रत्येकजण ज्युनियर तेंडुलकरची बराच वेळ वाट पाहत होता. अर्जुननेही त्याच्या दोन्ही पदार्पणाच्या सामन्यांमध्ये किफायतशीर गोलंदाजी केली आणि प्रसिद्धी मिळवली. केकेआर विरुद्ध त्याने 2 षटकात 17 धावा दिल्या आणि हैदराबाद विरुद्ध त्याने 2.5 षटकात केवळ 18 धावा देऊन एक बळी घेतला.

आयपीएलमध्ये पहिली विकेट घेतल्यानंतर अर्जुनवर क्रिकेट जगतातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडिया ट्रोलर्सनी त्याच्या गोलंदाजीमध्ये दोष शोधून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदाचेही नाव चर्चेत आले आहे. (Arjun Tendulkar Troll)

अर्जुन तेंडुलकरने पदार्पणाच्या सामन्यात आयपील करियरचे पहिले षटक टाकताना केवळ चार धावा दिल्या. त्यानंतर मात्र त्याचे दुसरे षटक थोडे महागडे ठरले. त्याने एकूण 2 षटकात 17 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर त्या सामन्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्जुनला गोलंदाजी दिली नाही. यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा अर्जुनला ओपनिंग गोलंदाजीची संधी दिली. त्याने पहिल्या 2 षटकात केवळ 14 धावा देऊन किफायतशिर गोलंदाजी केली. यानंतर डावाच्या शेवटच्या षटकात 20 धावांचा बचाव करताना अर्जुनने केवळ 4 धावा देत आपली पहिली विकेट मिळवली. यानंतर अर्जुन सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत होता. यात काही चाहते त्याची प्रशंसा करत होते तर दुसरीकडे त्याला ट्रोलचा सामना करावा लागला. (Arjun Tendulkar Troll)

शाहिद आफ्रिदीचे नाव चर्चेत…?

पाकिस्तानचा माजी स्टार क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीबाबत थेट कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या टोळीने अर्जुनच्या गोलंदाजीचा वेग हा मुद्दा बनवला आहे. खरेतर, दुसऱ्या सामन्यात पहिले षटक टाकताना अर्जुन तेंडुलकरने शेवटचा चेंडू अवघ्या 107 किमी प्रतितास वेगाने टाकला. यावर ट्रोलर्सनी आफ्रिदीचा एक स्क्रीनशॉट शेअर करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये पाकिस्तानी खेळाडू 134 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होता.

दोन्ही सामन्यांमध्ये अर्जुनच्या गोलंदाजीचा वेग कमाल 130 किमी प्रतितास इतका राहिला. याच कारणामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला.

Back to top button