SRH vs PBKS : पंजाबचे हैदराबादला १४४ धावांचे आव्हान | पुढारी

SRH vs PBKS : पंजाबचे हैदराबादला १४४ धावांचे आव्हान

हैदराबाद; वृत्तसंस्था : डावखुरा कर्णधार शिखर धवनने नाबाद 99 धावांच्या खणखणीत खेळीसह आपला फॉर्म पुन्हा एकदा अधोरेखित केला असला तरी काही प्रमाणात सॅम करण (22) वगळता अन्य सर्व फलंदाजांनी निव्वळ निराशाच केली. यानंतर पंजाब किंग्जला आयपीएल साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध निर्धारित 20 षटकांत 9 बाद 143 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले.

डावखुर्‍या शिखर धवनची धुवाँधार फलंदाजी हे या डावाचे ठळक वैशिष्ट्य ठरले. धवनने चौफेर फटकेबाजी करत आपल्या वैभवशाली कारकिर्दीच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. त्याने आपल्या भात्यातील एकापेक्षा एक फटक्यांची जणू बरसात करत हैदराबादच्या गोलंदाजांना अक्षरश: ‘सळो की पळो’ करून सोडले. डावातील शेवटच्या षटकात शतकासमीप आल्यानंतर मात्र त्याचा वेग मंदावला आणि शेवटच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर त्याला नाबाद 99 धावांपर्यंत पोहोचता आले.

हैदराबादने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवला. मॅथ्यू शॉर्ट (1), जितेश शर्मा (4), सिकंदर रझा (5), एम. शाहरुख खान (4) हे आघाडीचे सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. केवळ शिखर धवन व सॅम कुरेन 22 या दोघाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. तळाच्या क्रमवारीत हरप्रीत ब—ार (1), राहुल चहर (0), नॅथन इलिस (0) यांनीही केवळ हजेरी लावण्याचे कर्तव्य पार पाडले.

सनरायझर्स हैदराबादतर्फे मयंक मार्कंडे सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांत 15 धावातच 4 फलंदाज गारद केले. याशिवाय, उमरान मलिक व मार्को जॉन्सन यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भुवनेश्वर कुमारने डावातील पहिल्याच चेंडूवर प्रभसिमरन सिंगला गोल्डन डकवर बाद केले.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्ज : 20 षटकांत 9 बाद 143. (शिखर धवन नाबाद 99, सॅम कुरेन 22. मयंक मार्कंडे 4/15, उमरान मलिक 2/32, मार्को जॉन्सन 2/16.)

हेही वाचा;

Back to top button