RR vs DC : राजस्थानचा दिल्लीवर ५७ धावांनी विजय | पुढारी

RR vs DC : राजस्थानचा दिल्लीवर ५७ धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आयपीएल २०२३ च्या ११ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजी करण्यास सांगितले. राजस्थानकडून फक्त तीनच फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला. या तिघांनी मिळूनच दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे दिल्लीला  १४२ धावापर्यत मजल मारता आली. यामुळे राजस्थानने सामन्यात ५७ धावांनी विजय मिळवला. (RR vs DC)

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या खेळाडूनी डावाची सुरूवात आक्रमक केली. राजस्थानचे सलामीवीर बटलर आणि जैस्वाल यांनी पहिल्या विकेटासाठी ९८ धावांची भागीदारी केली. यामध्ये बटलरने ५१ बॉलमध्ये ७९ धावा केल्या. यामध्ये ११ चौकार आणि १ षटकार लगावला. तर, जैस्वालने ३१ बॉलमध्ये ६१ धावांची खेळी केली. त्यानेही ११ चौकार आणि १ षटकार लगावला. ही धोकादायक जोडी फोडण्याची कामगिरी दिल्लीचा गोलंदाज मुकेश कुमारने केली. शेवटच्या ओव्हरमध्ये हेटमायरने आक्रमक खेळी करत संघाला १९९ धावांची मजल मारून दिली. त्याने २१ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. यामध्ये १ चौकार आणि ४ षटकार लगावले. या तीन फलंदाजाशिवाय इतर फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. गोलंदाजीमध्ये दिल्लीकडून मुकेश कुमारने २ बळी टिपले. तर, कुलदीप यादव आणि पॉवेल यांनी प्रत्येकी १ बळी टिपले. (RR vs DC)

राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. सलामीवीर पृथ्‍वी शॉ शून्‍यवर बाद झाला. त्‍याने केवळ तीन चेंडूचा सामना केला. ट्रेंट बोल्टच्‍या गोलंदाजीवर त्‍याने यष्‍टीरक्षक संजू सॅमसनकडे झेल दिला. यानंतर मनीष पांडे यालाही बोल्‍टने बाद केले. कर्णधार डेव्हिड वॉर्नरआणि रिली रुसो यांनी धाव फलक हालता ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र १४ धावांवर खेळणार्‍या रिली रुसोला अश्‍विने बाद केले.

दिल्लीसाठी सर्वाधिक खेळी डेव्हिड वॉर्नरने केली. त्याने आपल्या खेळीत ५५ बॉलमध्ये ६५ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ५ चौकार लगावले. त्याच्यासह ललित यादवनेही झुंज दिली. २४ चेंडूत ३८ धावा केल्या. यामध्ये त्याने ५ चौकार लगावले. यांच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मैदानावर फार काळ टिकता आले नाही. राजस्थानकडून बोल्ट आणि चहल यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले. तर, अश्विनने २ आणि संदीप शर्माने १ बळी घेतला. गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे राजस्थानने दिल्लीला १४२ धावांवर रोखत ५७ धावांनी सामन्यात विजय मिळवला.

हेही वाचा;

Back to top button