IPL 2023 : अहो आश्चर्यम्..! चीअरलीडर्सची एका सामन्याची कमाई 12 हजार ते 24 हजार | पुढारी

IPL 2023 : अहो आश्चर्यम्..! चीअरलीडर्सची एका सामन्याची कमाई 12 हजार ते 24 हजार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 16 व्या आवृत्तीची आयपीएल स्पर्धा (IPL 2023) आता जोरात सुरू झाली असून प्रत्येक दिवसागणिक त्याचे फॅन फॉलोईंग वाढत चालले आहे. विक्रमी डाव, ऐतिहासिक विजय, अचंबित करून जाणार्‍या वैयक्तिक खेळी, यामुळे आयपीएल नव्या उंचीवर पोहोचते आहे. यातही याला आणखी उंची प्राप्त करून देण्यात आणखी एक घटक कमालीचे योगदान देत आहे अन् ते म्हणजे या स्पर्धेत चाहत्यांचे मनोरंजन करणारे चिअरलीडर्स. मागील अनेक हंगामात कोव्हिड प्रोटोकॉलमुळे स्टेडियमपासून दूर राहिलेल्या या चिअरलीडर्सचे यंदा मात्र अगदी थाटात पुनरागमन झाले आहे.

सध्या ज्या चिअरलीडर्स कार्यरत आहेत, त्यातील बर्‍याच विदेशी आहेत. आयपीएलच्या या चिअरलीडर्सची कमाई किती असते, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होईल. तर साधारणपणे या चिअरलीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी 14 ते 17 हजार रुपयांचे मानधन अदा केले जाते. अर्थात, हे ज्या त्या संघावर देखील अवलंबून असते. (IPL 2023)

चेन्नई, पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स हे आयपीएल फँचायझी आपल्या पथकातील चिअरलीडर्सना प्रत्येक सामन्यामागे 12 हजार रुपये मानधन देतात. मुंबई इंडियन्स व आरसीबीच्या चिअरलीडर्सचे मानधन 20 हजार रुपये इतके आहे तर केकेआरचे चिअरलीडर्स या निकषावर सर्वोच्च मानधन घेतात. त्यांना एका सामन्यासाठी 24 हजार रुपये इतके मानधन दिले जाते. या मानधन रकमेशिवाय, सदर चिअरलीडर्सना त्यांच्या परफॉर्मन्सवर आधारित बोनस दिला जातो. शिवाय, लक्झरी अ‍ॅकोमडेशन, फूड कूपन्स वेगळे मिळतात.

यंदा एकूण 12 शहरांत आयपीएलचे सामने खेळवले जात असून यात मोहाली, लखनौ, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, गुवाहाटी, धर्मशाला, मुंबईचा प्राधान्याने समावेश आहे.

हेही वाचा…

 

Back to top button