हॉकी इंडियाची बर्मिंघमधील राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार | पुढारी

हॉकी इंडियाची बर्मिंघमधील राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : भारतीय हॉकी संघाने बर्मिंघम येथे होणाऱ्या २०२२ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. ब्रिटनमधील कोविडची परिस्थिती आणि विलगीकरण ठेवण्याच्या नियमांमुळे भारतीय संघाने हा निर्णय घेतला आहे. युकेमध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीसाठी १०-दिवस विलगीकरण ठेवणे अनिवार्य आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्र निंगोबाम यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनाही आपला निर्णय कळवला आहे.

हॉकी इंडियाने म्हटले आहे की बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स (२८ जुलै ते ८ ऑगस्ट) आणि ग्वांग्झू एशियन गेम्स (१० ते २५ सप्टेंबर) दरम्यान फक्त ३२ दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे ते आपल्या खेळाडूंना ब्रिटनमध्ये पाठवण्याचा धोका पत्करणार नाहीत. कारण कोरोना व्हायरस सर्वाधिक फटका बसणाऱ्या यादीतील देशांमध्ये ब्रिटनचा समावेश आहे.

निंगोबम यांनी लिहिले आहे की, आशियाई गेम्स २०२४ ही पॅरिस ऑलिम्पिक गेम्ससाठी एक महाद्वीपीय पात्रता स्पर्धा आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांचे प्राधान्य लक्षात घेऊन हॉकी इंडिया कॉमनवेल्थ गेम्स दरम्यान कोणत्याही खेळाडूला कोरोना संक्रमित होण्याचा धोका पत्करु शकत नाही.

ब्रिटेनने अलीकडेच भारतातील कोविड -१९ च्या लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता देण्यास नकार दिला होता. तसेच ब्रिटेनने पूर्ण लसीकरण झालेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना १० दिवस सक्तीचे विलगीकरण केले आहे. ब्रिटीनच्या या निर्बंधांनंतर भारतानेही ब्रिटिश नागरिकांनी देशात येण्यावर असेच निर्बंध लादले आहेत.

भारताच्या नवीन नियमांनुसार, ब्रिटीनमधून येणाऱ्या सर्व नागरिकांना त्यांच्या लसीकरणाची स्थिती विचारात न घेता आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल त्यांच्या प्रवासाच्या ७२ तासांच्या आत दाखवावा लागेल. भारतात आल्यावर त्यांची विमानतळावर आणि नंतर आठव्या दिवशी आणखी दोन RT-PCR चाचण्या होतील.

हॉकी इंडियाने भुवनेश्वरमध्ये पुढच्या महिन्यात होणाऱ्या पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यावर एक दिवसानंतर हे पाऊल उचलले आहे.

Back to top button