WPL 2023 : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय | पुढारी

WPL 2023 : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय

मुंबई, वृत्तसंस्था : वूमेन्स प्रिमियर लीगमधील (WPL 2023) मुंबई इंडियन्स संघाचा धडाका सुरूच असून त्यांनी मंगळवारी गुजरात जायंटस् संघावर तब्बल 55 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्स संघाचा हा सलग पाचवा विजय असून अंतिम फेरीच्या द़ृष्टीने त्यांनी आगेकूच केली आहे.

मुंबई इंडियन्सने ठेवलेले 163 धावांचे लक्ष्य गुजरात जायंटस्ला गाठता आले नाही, त्यांनी 20 षटकांत 9 बाद 107 धावांची मजल मारली. हरलीन देवोल (22), कर्णधार स्नेह राणा (20), एस मेघना (16) आणि सुषमा वर्मा (18) यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मुंबईकडून नॅट सीवर-ब्रंट आणि हिली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. हेली मॅथ्यूजला डावाच्या पहिल्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर ऍशले गार्डनरने बाद केले. तिला खातेही उघडता आले नाही. यानंतर नॅट सीवर-ब्रंट आणि यास्तिका भाटिया यांनी दुसर्‍या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. नॅट सीवर-ब्रंट 31 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 36 धावा करून बाद झाली. यास्तिका भाटियाचे अर्धशतक हुकले आणि 37 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 44 धावा केल्यानंतर ती धावबाद झाली. यानंतर हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर यांनी चौथ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. अमेलिया 19 धावा करून बाद झाली.

कर्णधार हरमनप्रीत कौरने झंझावाती अर्धशतक ठोकले; पण अर्धशतकानंतर तिने तिची विकेट गमावली. हरमनप्रीतने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. गुजराततर्फे अ‍ॅश्ले गार्डनरने तीन बळी घेतले. तर किम गर्थ, स्नेह राणा आणि तनुजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

संक्षिप्त धावफलक (WPL 2023)

मुंबई इंडियन्स : 20 षटकांत 8 बाद 162 धावा. (यास्तिका भाटिया 44, हरमप्रीत कौर 51, नॅट सीवर-ब्रंट 36. अश्लेग गार्डनर 3/34)
गुजरात जायंटस् : 20 षटकांत 9 बाद 107 धावा. (हरलीन देओल 22, स्नेह राणा 20. नॅट सीवर-ब्रंट 3/21, हेली मॅथ्यूज 3/23.)

Back to top button