R Ashwin : कसोटीत सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ जिंकणारा दुसरा खेळाडू | पुढारी

R Ashwin : कसोटीत सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द सिरीज' जिंकणारा दुसरा खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनची (R Ashwin) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजासह ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवड करण्यात आली. त्याने कसोटीत हा पुरस्कार मिळवण्याची ही 10वी वेळ असून कसोटीत सर्वाधिक वेळा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ ठरलेला तो दुसरा खेळाडू बनला आहे.

अश्विनने (R Ashwin) द. आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिसला मागे टाकले. कॅलिस हा नऊ वेळा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा मानकरी ठरला होता. अश्विन आता विश्वविक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने कसोटीत सर्वाधिक 11 वेळा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा किताब पटकावला आहे. आता अश्विनला त्याला मागे टाकण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अश्विनने 4 कसोटीत 25 बळी घेतले आणि फलंदाजीत 79 धावांचे योगदान दिले.

अश्विनचा ऐतिहासिक डबल धमाका! बॉर्डर-गावसकर मालिकेत रचला इतिहास

अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद केली आहे. सोमवारी अहमदाबाद कसोटीच्या पाचव्या दिवशी त्याने कांगारूंच्या दुस-या डावात कुहनेमनची विकेट घेत या मालिकेत 25 बळी पूर्ण केले. यासह तो बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेच्या इतिहासात दोनदा 25 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

अश्विनने याआधी 2012-13 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेत 29 विकेट घेतल्या होत्या. या यादीत त्याने भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांना मागे टाकले. दोघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक-एक वेळा 25 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला होता.

एका बॉर्डर गावसकर मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये हरभजन सिंग 32 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर अश्विन 29 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेत आतापर्यंत असे फक्त 5 गोलंदाज आहेत ज्यांनी 25 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. अश्विन, कुंबळे आणि भज्जी व्यतिरिक्त या यादीत चौथे नाव रवींद्र जडेजाचे आहे. 2016-17 च्या घरच्या मालिकेत जड्डूने ही किमया केली होती. या यादीत एकमेव ऑस्ट्रेलियन गोलंदाज बेन हिल्फेनहॉस आहे ज्याने 2011-12 मध्ये 27 बळी घेतले होते.

Back to top button