

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin vs Steve Smith : टीम इंडियाचा जादूई फिरकीपटू आर. अश्विन ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी संकट बनला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अश्विनने तीन चेंडूंत दोन बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीची दाणादाण उडवली. 22.4 व्या षटकात लबुशेन आणि त्याच षटकाच्या 6 व्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथला बाद करून त्याने नवा विक्रम नोंदवला.
स्टीव्ह स्मिथला बाद करताच अश्विनने यासिर शाहच्या विक्रमाशी बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने 7व्यांदा स्टीव्ह स्मिथला शून्यावर बाद केले. यासिर शाहनेही स्टीव्ह स्मिथला 7 वेळा बाद केले आहे. तर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने स्मिथला 9 वेळा शून्यावर माघारी पाठवले आहे, तर जेम्स अँडरसनने स्मिथला 8 वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. (R Ashwin vs Steve Smith)
दिल्ली कसोटीत अश्विनने गोलंदाजी करताना आपल्या रणनीतीत मोठा बदल केला. त्याने राउंड द विकेटवरून मारा केला आणि विकेट्स मिळवल्या. अश्विनने 23 षटकाच्या चौथ्या चेंडूवर लबुशेनला एलबीडब्ल्यू करून बाद केले. त्यानंतर याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर स्मिथला शून्यावर आल्या पावले माघारी धाडले. स्मिथने ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला पण, चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षक श्रीकर भरतच्या ग्लोव्हजमध्ये गेला.
जडेजा नंतर अश्विन हा एकमेव गोलंदाज आहे ज्याच्या मा-याचा सामना करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांची भांबेरी उडाली आहे. कसोटीतील नंबर 1 आणि नंबर 2 चे फलंदाजही त्याच्यापुढे नतमस्तक होताना दिसले. अश्विनने नागपूर कसोटीत सर्वाधिक 8 विकेट घेतल्या होत्या.