Australian Open 2023 : संधीचा फायदा घेऊन स्टेफनॉस त्सित्सिपास विजेतेपदासाठी सज्ज | पुढारी

Australian Open 2023 : संधीचा फायदा घेऊन स्टेफनॉस त्सित्सिपास विजेतेपदासाठी सज्ज

उपांत्य फेरीत करेन खाचानोव्हला नेस्तनाबूत करून ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन च्या अंतिम फेरीत पोहोचल्यावर स्टेफनॉसने प्रसिद्धी माध्यमाशी संवाद साधला तेव्हा तो अतिशय जोशात दिसला. त्याची प्राथमिक प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. स्टेफनॉस म्हणाला, मी उत्तम खेळ करतोय आणी आनंद मिळतोय. अत्यंत सकारात्मक वातावरण अनुभवतोय. अंतिम फेरीत कोणाशी गाठ पडेल याचा विचार करत नाही. मी द़ृष्टिकोन मानसिकता बदलली आहे. विम्बल्डन आणि युनायटेड कप स्पर्धेत दडपण हाताळण्यात यश मिळाले. (Australian Open 2023)

त्सित्सिपास पुढे म्हणाला, मी 2015 ला इथे ज्युनिअर स्पर्धा खेळलो. आता पुरुष एकेरीत अंतिम फेरीत खेळतोय. हे विलक्षण आहे. इथे ग्रीस आणि सर्बियाचे अनेक लोक राहतात. त्यांचा पाठिंबा मिळतो आणी आत्मबळ मिळते. (Australian Open 2023)

तमाम रसिकांचे लक्ष लागलेल्या दुसर्‍या उपांत्य फेरीतील सामन्यात महान जोकोव्हिचने टॉमी पॉलचा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडून अंतिम फेरीत दिमाखाने प्रवेश केला. नोव्हाक आता 22 व्या ग्रँड स्लॅम विजेते पदापासून 1 सामना दूर आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा आता उत्सुकता आणि थरार यांच्या अंतिम टप्प्यावर असून 28 रोजी अर्यांना सबालेंका आणि एलेना रिबाकीना यापैकी कोण ऑस्ट्रेलियन ‘टेनिस क्वीन’ होणार हे कुतूहल पराकोटीला पोहोचले आहे.

  • उदय बिनीवाले

Back to top button