क्रीडा : विश्वचषकाचे खरे नायक | पुढारी

क्रीडा : विश्वचषकाचे खरे नायक

  • नितीन कुलकर्णी

विश्वविजेत्या अर्जेंटिनाच्या यशामध्ये मेस्सीचे योगदान जितके मोठे आहे, तितकेच गोलकीपर इमिलियाने मार्टिनेजचे. अंतिम सामन्यातील अनेक अवघड वळणांवर प्रतिस्पर्धी संघाकडून करण्यात येणारे गोल रोखून मार्टिनेजने अर्जेंटिनाचा विजय सुकर बनवला आणि मेस्सीच्या संघर्षाला यशापर्यंत जाण्याची वाट मोकळी करून दिली. त्याचबरोबर फ्रान्सच्या एम्बाप्पेचा खेळही केवळ अविस्मरणीय ठरला.

क्रीडाविश्वातील सर्वात महागड्या स्पर्धांचे आयोजन म्हणून उल्लेखल्या गेलेल्या फिफा विश्चषकाचे सूप अखेर वाजले. एखादा व्यक्ती कट्टर फुटबॉलप्रेमी नसला, तरी फिफा विश्वचषक स्पर्धेतील अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातला क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा रोमांचकारी अंतिम सामना पाहून भारावून गेला नसेल तर नवलच. या सामन्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल सहा गोल नोंदले गेले. या रोमहर्षक सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारली आणि 36 वर्षांनंतर विश्वचषक जिंकत महान खेळाडू दिएगो मॅराडोना यांचे स्वप्न पूर्ण झालेे. सामान्यतः, फुटबॉलच्या मैदानावर युरोपियन देशांचे वर्चस्व राहिले आहे. यंदाच्या विश्वचषकात शेवटच्या 16 पैकी आठ आणि शेवटच्या आठपैकी पाच आणि शेवटच्या चारपैकी दोन संघ युरोपातील होते. यावरून युरोपीय संघांचे वर्चस्व दिसून येते. परंतु, जवळपास दोन दशकांंनंतर पहिल्यांदाच एका दक्षिण अमेरिकी देशाला फुटबॉलमधील अजिंक्यपद मिळाले आहे. यापूर्वी 1986 मध्ये मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकला होता. आता मॅराडोनाचाच एक लाडका खेळाडू असणार्‍या लियोनल मेस्सीने कतारमध्ये आयोजित फुटबॉलच्या महासंग्रामात आपल्या देशाचे नाव उंचावले आहे. साहजिकच, या विजयानंतर सबंध अर्जेंटिना आनंदोत्सवात चिंब झालेला दिसला. दोन वर्षांपूर्वी दिएगोे मॅराडोनाचे निधन झाले. फुटबॉलपटू म्हणून आणि त्यानंतर प्रशिक्षक म्हणून मॅराडोनाने आपल्या देशाला विश्वचषक मिळवून देण्यासाठी अपार मेहनत घेतली आणि संघर्ष केला. मॅराडोना यांना काही बाबतीत मेस्सीबद्दल तक्रारी होत्या, हे खरे असले तरी मेस्सीलाच ते आपला उत्तराधिकारी मानत असत. आज मेस्सी मॅराडोनाच्याही पुढे निघून गेला आहे.

अर्जेंटिनाच्या विजयामध्ये मेस्सीचे योगदान जितके मोठे आहे, तितकेच गोलकीपर इमिलियाने मार्टिनेजचे आहे. त्यामुळे या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करताना त्याची आठवणही जागवली जाईल, यात शंकाच नाही. महाअंतिम सामन्यातील अनेक अवघड वळणांवर प्रतिस्पर्धी संघाकडून करण्यात येणारे गोल रोखून मार्टिनेजने अर्जेंटिनाचा विजय सुकर बनवला आणि मेस्सीच्या संघर्षाला यशापर्यंत जाण्याची वाट मोकळी करून दिली. 2006 च्या विश्वचषक स्पर्धेपासून मेस्सी अर्जेंटिनाकडून मैदानात उतरत आहे. 2014 च्या विश्वचषक स्पर्धेत मेस्सीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु, जर्मनीकडून एक गोलने त्यांचा पराभव झाला. 2018 मध्ये अर्जेंटिनाच्या संघाची कामगिरी अत्यंत निराशानजक झाली होती. त्यामुळे मेस्सीचा संघ आता विश्वचषकापासून कोसो दूर राहील, अशी टीका होऊ लागली होती. परंतु, मेस्सीने आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. फुटबॉलच्या क्षेत्रातील प्रस्थापित खेळाडूंसाठी आणि नव्याने या क्रीडा प्रकारात येणार्‍या खेळाडूंसाठी तो एक आदर्श ठरला आहे.

यंदाचा फुटबॉल विश्वचषक आणखी एका खेळाडूच्या नावाने ओळखला जाईल. तो म्हणजे फ्रान्सचा कायलिन एम्बाप्पे. धडाकेबाज कामगिरीमुळे कायलिन एम्बापेने आपला 24 वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी जगाला कवेत घेतले. अंतिम सामन्यातील त्याचा खेळ केवळ अविस्मरणीय होता. या सामन्यात निर्माण केलेला थरार हा अद्वितीय होता. एम्बाप्पेने प्रतिस्पर्ध्यास लीलया पद्धतीने उत्तर दिले असले, तरी अशाप्रकारची खेळी आपण मेस्सीच्या रूपातून नेहमीच पाहत आलो आहोत. आगामी विश्वचषकात त्याचा खेळ आणखीच बहरेल, यात तिळमात्र शंका नाही. अंतिम सामन्यात त्याने सर्वोच्च दुसरी कामगिरी नोंदविली आहे. संपूर्ण सामन्यावर अर्जेंटिनाचे वर्चस्व असताना आणि शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना एम्बाप्पेने गोल करून खळबळ उडवून दिली. नियमित वेळेत संपणारा सामना पेनल्टी स्ट्रोकपर्यंत गेला आणि त्याचे श्रेय एम्बाप्पेच्या सरस खेळीला द्यावे लागेल. त्याला ‘गोल्डन बूट’ हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार सर्वाधिक गोल करणार्‍या खेळाडूला दिला जातो. यामध्ये सोन्याने बनवलेला एक जोडा असतो आणि त्याद्वारे खेळाडूला सन्मानित केले जाते. हा पुरस्कार 1982 पासून सुरू करण्यात आला. एम्बाप्पेने संपूर्ण स्पर्धेत एकूण 9 गोल नोंदवले. त्यात अंतिम सामन्यातील तीन गोलचा समावेश आहे. उत्तर अमेरिकेतील अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या आगामी विश्वचषक 2026 मध्ये सर्वांच्या नजरा एम्बाप्पेवर खिळलेल्या असतील, हे आता स्पष्ट झाले आहे.

मध्य पूर्वेच्या देशात यंदा पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषकासाठीचा महासंग्राम रंगला. यापूर्वी कोणत्याही अरब देशामध्ये अशाप्रकारच्या आयोजनाचा विचारही केला गेला नव्हता. जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असणार्‍या कतारने या स्पर्धेच्या आयोजनासाठी 300 अब्ज डॉलरहून अधिक पैसा खर्च केला. यातून किती कमाई झाली, हा मुद्दा महत्त्वाचा असला; तरी त्याहीपेक्षा या नियोजनातून जो सन्मान कतारला मिळाला आहे, त्याला संपूर्ण अरब जगतातून गौरवले जाईल. 32 संघ, 64 सामने आणि विक्रमी 172 गोल झालेल्या या स्पर्धेच्या आयोजनाने संपूर्ण जगाला अचंबित केले. विशेष म्हणजे, सध्याचे एकंदर जागतिक वातावरण पाहिल्यास युद्ध आणि ऊर्जा संकटाच्या भयछायांनी ग्रासलेले आहे. अशावेळी इतक्या आलिशान पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन करणे युरोपियन देशांना शक्य झाले नसते. जगभरातील जवळपास दीड अब्ज लोकांनी या खेळाचे आयोजन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपाने पाहिले.

भारतातही सुमारे चार कोटी प्रेक्षकांनी या स्पर्धेचा अंतिम सामना पाहिला. या स्पर्धेतून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे संपूर्ण जगाला जोडण्याची ताकद या खेळामध्ये आहे! उपांत्य फेरीपर्यंत धडक मारणार्‍या मोरोक्कोने या अरब-आफ्रिकी देशाला पाहून हा खेळ विश्वव्यापी असल्याचे सिद्ध झाले. फुटबॉल पाहणार्‍या निम्म्या लोकांमध्ये आपला देश या स्पर्धेत खेळत नसल्याची खंत होती. ते युरोपीय क्लबमधून खेळलेले होते. जाता जाता, या विश्वचषकाचे सर्वात मोठे यश हे एखादा संघ विजयी होण्यात नसून, एम्बाप्पेला कृष्णवर्णीय म्हणून नाही; तर फुटबॉलपटू म्हणून जगाने पाहिले. एखाद्या खेळाला जात, देश आणि विशिष्ट ओळखीचे वलय असते. मात्र, जेव्हा किक मारली जाते, बॉल गोलपोस्टमध्ये जातो तेव्हा किमान त्या क्षणाला सर्व संकल्पना बाजूला ठेवून आपण जसे जगाकडे पाहतो, तसेच इतरवेळीही पाहिले गेले पाहिजे. हाच यंदाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा धडा आहे.

Back to top button