फ्रान्सचा अनुभव सरस ठरला | पुढारी

फ्रान्सचा अनुभव सरस ठरला

बाद फेरी म्हणजे पराभूत संघासाठी एक्झिट असते तर विजयी होणार्‍या संघासाठी त्यांची प्रतिष्ठा वाढवण्याची संधी असते. एक संघ स्पर्धेतून बाद होतो तर दुसरा संघ त्यांचे नाव उज्ज्वल करत नवीन कीर्ती स्थापन करतात. या स्पर्धेचे ड्रॉ बघितले तर फ्रान्स, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगीज हे चारी बलाढ्य संघ एकाच बाजूला पडले होते. त्यामुळे त्यांना राऊंड ऑफ 16 ते उपांत्य फेरीपर्यंत एकमेकांबरोबर खेळायला लागणार होते. यातील फ्रान्स, इंग्लंड हे तर संभाव्य विजेत्यांमध्ये गणले जाणारे संघ.

पण याच दोन संघांदरम्यान उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना झाला. युवा प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असलेल्या दोन्ही संघांमध्ये अतिशय अटीतटीचा आणि रोमांचक सामना होईल अशी अटकळ होती. फुटबॉल असो वा अन्य कोणताही खेळ असो, विश्वचषकासारख्या स्पर्धेमध्ये बाद फेरीचे अटीतटीचे सामने खेळताना अनुभव आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा ठरतो. हाच अनुभव आणि आत्मविश्वास गतविजेत्या फ्रान्सच्या पारड्यात विजय टाकून गेला.

या दोन्ही संघांचा विचार केला तर फ्रान्सचा संघ अनुभवाच्या बाबतीत थोडासा जास्त तर इंग्लंडचा संघ प्रतिभेच्या बाबतीत उजवा होता. प्रत्येक विश्वचषकात इंग्लंडचा संघ कागदावर मजबूत नक्कीच मजबूत असतो, पण नेहमीच ते कागदी वाघ ठरतात. यावेळीही असेच झाले. फ्रान्सने बाजी मारत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि इंग्लंडचे 1966 नंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. 1946 पासून प्रशिक्षक वॉल्टर विंटरबॉटम यांच्यापासून सुरू असणारा विश्वचषकाचा दुष्काळ गेराथ साऊथगेट यांच्यापर्यंत कायम राहिला.

इंग्लिश फुटबॉलमध्ये डेव्हिड बॅकहॅम, वेन रूनी, बॉबी चार्टन, हॅरी केन, फ्रँक लांपार्ड असे कितीतरी दिग्गज असूनसुद्धा हा संघ विश्वचषकापासून वंचित राहिला. याचे मुख्य कारण इंग्लिश संघामध्ये ठासून भरलेला प्रोफेशनलिझम असू शकतो. काही वेळेस यश मिळवण्यासाठी व्यावसायिकता बाजूला ठेवून संघहित, राष्ट्रहित यांसारखी मूल्ये जोपासावी लागतात. सांघिक खेळात संघभावना आणि एकी महत्त्वाची असते. इंग्लिश संघ याबाबतीत नेहमीच थोडासा कमी वाटतो.

फ्रान्स 4-2-3-1 तर इंग्लंड 4-3-3 या पारंपरिक फॉर्मेशनने मैदानात उतरले होते. इंग्लंडने ग्रीजमन, एम्बापे यांना पहिल्यापासून मार्क केल्यामुळे इतर मध्यफळीतील खेळाडू थोडेसे फ्री राहात होते. याचाच फायदा उठवत रियल मॅट्रिडचा युवा खेळाडू ओरेलियन चौआमेनी याने सोळाव्या मिनिटाला मारलेल्या लाँग किकवर गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. ही किक इतकी अचूक होती की इंग्लिश गोलकिपर पिकफोर्डला कोणतीही संधी मिळाली नाही. दुसर्‍या हाफमध्ये साकाला पाडल्याबद्दल मिळालेल्या पेनल्टीवर हॅरी केनने गोल करत इंग्लंडला बरोबरी साधून दिली. यानंतर फ्रान्सचा मोेमेंटम थोडा बिघडलेला होता. त्याचा फायदा इंग्लिश संघ उठवू शकला नाही.

76 व्या मिनिटाला फ्रान्सला एक चांगली संधी मिळाली, पण इंग्लिश किपर पिकफोर्डने चांगला बचाव केला. पण लगेचच डाव्या फ्लँकमधून मिळालेल्या क्रॉसवर हेडरद्वारे गोल करत ऑलिव्हर जिरॉडने पुन्हा फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. यानंतर 81 व्या मिनिटाला इंग्लंडचा आक्रमक खेळाडू माऊंटला ढकलल्याबद्दल इंग्लंडला पुन्हा पेनल्टी मिळाली, पण यावेळी मात्र हॅरी केनने मारलेली पेनल्टी गोलपोस्टवरून गेली. हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. यानंतर सामना संपताना काही मिनिटे बाकी असताना इंग्लंडला मोठ्या डी बाहेर फ्री किक मिळाली.

मार्कस रेशफर्डने मारलेली ही फ्री किक गोलपोस्टला चाटून गेली आणि इंग्लंडला पुन्हा मिळालेली बरोबरीची संधी वाया गेली. इंग्लंडचा बचाव ही इंग्लंडची पहिल्यापासूनच चिंता होती. या सामन्यात बचावफळीतील कमतरतेमुळे त्यांना सामना गमवावा लागला. प्रेशर सिच्युएशनमध्ये अनुभवी हॅरी केन अतिशय चांगली कामगिरी करतो, पण या सामन्यात त्याने दबावाखाली पेनल्टी बाहेर मारली. याउलट ग्रीसमनने अनुभवाच्या जोरावर फ्रान्सला आक्रमणाच्या संधी निर्माण करून दिल्या. पहिल्या गोलला चौआमेनीला असिस्ट केले आणि दुसर्‍या गोल वेळी गिरूला अचूक क्रॉस टाकला. याच या दोन्ही संघांच्या जय-पराजयातील मुख्य फरक होता.

या सामन्यात फ्रान्सचा कर्णधार हयुगो लॉरीस याने उत्कृष्ट गोल रक्षण केले. फ्रान्सने सामना जिंकला असला तरी त्यांच्या बेशिस्तीमुळे इंग्लंडला दोन पेनल्टी मिळाल्या. यावर फ्रान्सचे प्रशिक्षक डेशचाम्प नक्कीच नाराज असतील. फ्रान्सचा उपांत्य फेरीतील सामना स्पर्धेतील अंडरडॉक्स मोरोक्कोबरोबर होईल.

Back to top button