वेध विश्वचषकाचे : फिफा वर्ल्डकप 2022 कतार | पुढारी

वेध विश्वचषकाचे : फिफा वर्ल्डकप 2022 कतार

  • प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील

     ग्रुप ‘जी’

ब्राझीलसाठी सोपा मार्ग
या स्पर्धेचा सातवा गट म्हणजेच ग्रुप ‘जी’मध्ये ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड आणि कॅमेरून या संघांचा समावेश आहे. ब्राझीलसाठी हा गट अतिशय सोपा असून या गटातून ब्राझील स्पर्धेत पुढे आगेकूच करेल यात शंका नाही. सर्बिया आणि स्वित्झर्लंड या दोन संघांत बाद फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी म्हणजेच दुसर्‍या क्रमांकासाठी चढाओढ असेल.

                                                                       1. ब्राझील 

स्टार प्लेयर - नेमार

जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या या संघाला नेहमीच विश्वचषकामध्ये संभाव्य विजेत्यांमध्ये गणले जाते. पाच विश्वचषक विजेत्या या संघाकडे यावर्षीसुद्धा विश्वचषकावर आपले नाव कोरण्याची चांगली संधी आहे. या स्पर्धेत संघातील खेळाडूंना योग्य लय सापडल्यास त्यांना रोखणे कोणत्याही संघासाठी कठीण आव्हान असेल.

बलस्थान : आक्रमक फळी नेहमीच या संघाचे बलस्थान राहिलेले आहे. त्याचबरोबर अ‍ॅलिसनसारखा चांगला गोलकीपर संघाकडे आहे. टॅक्टिकल फुटबॉल खेळण्यावर या संघाचा भर असतो. दर्जा आणि अनुभवाच्या बाबतीत हा संघ सर्वच संघांपेक्षा उत्कृष्ट आहे.

कच्चे दुवे: इतिहास सांगतो की या संघाला जर योग्य ती लय सापडली नाही तर हा संघ त्यांच्या क्षमतेप्रमाणे खेळ करण्यात अपयशी ठरतो. अपेक्षांचे ओझे ते कसे पेलतात हे खूप महत्त्वाचे आहे. तसेच संघातील अनुभवी खेळाडू कसा खेळ करतात यावर त्यांचे स्पर्धेतील आव्हान टिकून राहील.

कामगिरीचा अंदाज : हा संघ उपांत्य फेरीपर्यंत नक्कीच मजल मारेल, पण सध्याच्या फुटबॉल जनरेशनमध्ये त्या- त्या दिवसाच्या खेळावर संघाची पुढील वाटचाल ठरते. त्यामुळे ब—ाझीलला गाफील राहून चालणार नाही.

                                                                2. सर्बिया

दुसान टेडीक

जागतिक क्रमवारीत 21 व्या स्थानावर असलेला हा संघ गेल्या वर्षी साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. एकूणच विश्वचषकाचा विचार करता त्यांची कामगिरी तितकी चांगली नाही असे दिसून येते. विश्वचषक पात्रता फेरीमध्ये सुद्धा संघर्ष करूनच त्यांना कतारचे तिकीट मिळालेले आहे. म्हणूनच या संघाला ‘अंडर अ‍ॅचिविंग’ संघ म्हणून संबोधण्यात येते.

बलस्थान : हा संघ संतुलित आणि आक्रमक आहे. या संघाकडे आक्रमणातील आणि गरजेप्रमाणे खेळण्याची विविधता आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या खेळाच्या शैलीचा अंदाज लागत नाही. वेगवान आक्रमक विंगर बॅक हे आक्रमणातील त्यांचे मुख्य अस्त्र आहे.

कच्चे दुवे : हा संघ आक्रमक असल्यामुळे आणि दोन्ही विंगर बॅक आक्रमणामध्ये मदत करत असल्यामुळे बचावफळीवर त्याचा अतिरिक्त ताण पडतो. तुल्यबळ संघाविरुद्ध बचाव करताना या संघास नक्कीच अडचणी निर्माण होतील. या संघामध्ये एकसंधता नाही.

कामगिरीचा अंदाज : बाद फेरीत पोहोचण्यासाठी या संघास स्वित्झर्लंड आणि कॅमेरून या दोन संघांविरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल. सध्याचा फॉर्म बघता या संघाची स्पर्धेतील वाटचाल खडतर आहे.

 

                                                        3. स्वित्झर्लंड

स्टार प्लेयर - ग्रॅनीट झॅका

जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असलेला हा संघ विश्वचषक पात्रता फेरीमध्ये त्यांच्या गटामध्ये अजिंक्य राहिलेला आहे. विश्वचषक स्पर्धेत या संघाची कामगिरी नेहमीच चांगली राहिलेली आहे. सध्या संघाचा फॉर्म अतिशय चांगला असून नवीन प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाखाली हा संघ चांगली कामगिरी करत आहे. पण कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे बेभरवशाचा संघ म्हणून या संघाकडे बघितले जाते.

बलस्थान : नावीन्यपूर्ण फॉर्मेशनमुळे दोन्ही फ्लँकमधून हा संघ आक्रमण करू शकतो. संघभावना चांगली असल्यामुळे एकत्रित खेळ करण्यावर या संघाचा जास्त भर असतो. सध्या हा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा चांगला अनुभव आहे.

कच्चे दुवे : संघाकडे हुकमी स्ट्रायकर नाही त्यामुळे आक्रमणाच्या संधी निर्माण होऊनसुद्धा बर्‍याच वेळा गोल करण्यात या संघाला अपयश येते. याचा परिणाम संघाच्या कामगिरीतील सातत्यावर होतो.

कामगिरीचा अंदाज : स्वित्झर्लंडसाठी सर्बिया विरुद्धचा सामना निर्णायक असेल. हा सामना जिंकल्यास ते बाद फेरीसाठी पात्र ठरू शकतील, पण त्यानंतर पुढील फेरीमध्ये ते प्रवेश करतील, असे वाटत नाही.

                                                           4. कॅमेरून

अँडरे फ्रॅक झांबो

 

जागतिक क्रमवारी 43 व्या क्रमांकावर असलेला हा आफ्रिकन संघ गेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला नव्हता. या संघाची विश्वचषक स्पर्धेतील एकूण कामगिरी समाधानकारक नाही. तसेच या संघात आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर स्पर्धांमध्ये सुद्धा मोठे यश मिळालेले नाही. एकूणच या स्पर्धेत चांगली कामगिरी करून स्वतःला सिद्ध करणे हेच या संघासमोर मोठे आव्हान असेल.

बलस्थान : गेल्या काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या संघाने आक्रमणामध्ये बरीच सुधारणा केलेली दिसून येते. त्यामुळे ते कोणतेही संघ विरुद्ध गोल नोंदवू शकतात. चांगल्या संघाबरोबर खेळताना त्यांचा खेळ उत्कृष्ट झालेला आहे. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास द्विगुणीत झालेला आहे.

कच्चे दुवे : या संघातील खेळाडूंमध्ये एकीची भावना अतिशय कमी आहे. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव अतिशय कमी आहे. तसेच एखादा सामना गमावल्यास त्यातून पुन्हा उभारी घेऊन स्पर्धेत आपले आव्हान टिकवणे याबाबतीत हा संघ कमी पडतो.

कामगिरीचा अंदाज : या संघाकडून स्पर्धेत जास्त अपेक्षा नसल्या तरी ब—ाझील आणि इतर संघांबरोबर चांगला खेळ करून त्यांना टक्कर देण्याची मोठी अपेक्षा आहे.

Back to top button