T-20 World Cup : पहिली सेमीफायनल आज : पाक-न्यूझीलंड आमनेसामने : लढत शिस्‍तबध्द संघ विरूध्द नैसर्गिक संघात | पुढारी

T-20 World Cup : पहिली सेमीफायनल आज : पाक-न्यूझीलंड आमनेसामने : लढत शिस्‍तबध्द संघ विरूध्द नैसर्गिक संघात

विश्वचषकातील (T-20 World Cup) दोन आठवड्यांत कधी पावसाने तर कधी दुय्यम संघांच्या करामतीने उलथापालथ झाल्यावर आज आपण पहिल्या उपांत्य फेरीला सामोरे जाणार आहोत. न्यूझीलंड संघ स्वतःच्या खेळाने इथे पोहोचला आहे तर पाकिस्तानला द. आफ्रिकेच्या ऐन वेळेच्या कचखाऊ धोरणाने लॉटरी लागली. पाकिस्तानला बांगलादेशला हरवून इथे यावे लागले तरी बांगलादेश संघ हा काही सातत्य राखणारा संघ नाही. आपल्याला जरी त्यांनी दमवले तरी सातत्याने त्यांच्याकडून तशा कामगिरीची अपेक्षा नव्हती.

न्यूझीलंडचा या स्पर्धेतील खेळ बघता आजच्या सामन्यात तेच फेव्हरिट ठरतात. पण त्यांच्या विजयरथाला कोणी लगाम घालणारेच असले तर तो पाकिस्तानचा संघ आहे. पाकिस्तान संघातील गुणवत्ता बघता एखादा दिवस ते जगज्जेते असल्यासारखे खेळतात तर एखाद्या दिवशी झिम्बाब्वेकडूनही हरू शकतात. हे आजचे नाही तर पाकिस्तानचा संघ हा कायमच बेभरवशाचा राहिला आहे आणि त्यामुळेच तो सर्वात धोकादायक आहे.

सिडनीला मी सोमवारी आल्यापासून स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. पर्थ, अ‍ॅडलेडच्या थंडीचा इथे मागमूसही नाही. आजही असेच हवामान असेल. सिडनीची खेळपट्टी या सामन्यासाठी नवी असेल आणि ती फलंदाजीला पोषक असेल हे नक्की. इथे नाणेफेक जिंकणारा संघ पहिली फलंदाजी घेईल. एक तर उपांत्य सामन्यात खेळायचे दडपण असल्याने लक्ष्याचा पाठलाग करण्यापेक्षा पहिली फलंदाजी करण्यावर पसंती असेल आणि इथे या विश्वचषकातील सहापैकी पाच सामन्यांत पहिली फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. इंग्लंडने इथे श्रीलंकेचे मामुली 142 धावांचे लक्ष्य गाठले होते. पण पहिल्या पॉवर प्ले मध्ये 70 धावा काढूनही त्यांना जिंकायला 19 वे षटक लागले होते.

पाकिस्तानचा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बाबर आझमचा फॉर्म. या विश्वचषकात त्याला सूर गवसला नाही. बांगलादेशविरुद्ध केलेल्या 25 धावा त्याच्या या स्पर्धेतील सर्वोत्तम धावा आहेत आणि त्याही करताना ना त्याचे टायमिंग व्यवस्थित होते, ना त्याच्या फटक्यात आत्मविश्वास होता. गेल्या विश्वचषकापासूनच्या कालखंडातील सर्वात जास्त धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत चौथ्या असलेल्या बाबर आझमला झाले आहे तरी काय? मोहम्मद रिझवानचा गेल्या वर्षातील पॉवर प्लेचा स्ट्राईक रेट 112 आहे. त्याला पूरक असा फलंदाज दुसर्‍या बाजूने पाकिस्तानला हवा आहे. पण बाबरने ती कामगिरी चोख केलेली नाही. बाबरने सलामीचा फलंदाज म्हणून त्याच्या पदार्पणापासून गेल्या विश्वचषकापर्यंतच्या 36 सामन्यांत तो 7 वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाला तर गेल्या वर्षात सरासरीने दर एका सामन्याआड तो एक आकडी धावसंख्येवर बाद झाला. (T-20 World Cup)

रिझवान साथीला आल्यावर बाबरचा स्ट्राईक रेट आणि सरासरी दोन्ही लक्षणीय घसरली आहे. पाकिस्तान आजच्या सामन्यात तोच संघ ठेवेल असे दिसते. पण सलामीला रिझवानबरोबर बाबरच्या ऐवजी मोहम्मद हॅरिस सलामीला आला तर पाकिस्तानला फायदा होऊ शकतो, असा एक विचार पाकिस्तानच्या गोटात चालू असेल. कदाचित बाबरने त्याचा सर्वोत्तम खेळ या सामन्यासाठी राखून ठेवला असेल? आपल्या काही महिन्यांपूर्वी कोहलीच्या फॉर्मबद्दल ज्या चर्चा होत्या आणि त्याला कोहलीने उत्तर दिले तसेच काहीसे पाकिस्तानला बाबरबाबत अपेक्षित असेल.

न्यूझीलंडचा कॉनवे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील 92 धावांनंतर चमकला नाही. कॉनवे आणि अ‍ॅलन जोडी शाहिन आफ्रिदीला तोंड कसे देतात, यावर न्यूझीलंडचे भवितव्य असेल. कारण न्यूझीलंडची मधली फळी उपयुक्त असली तरी डावाचा डोलारा सांभाळू शकणारी नाही. न्यूझीलंडच्या जिमी निशमने या स्पर्धेत एकही चेंडू टाकलेला नाही. त्याचा वापर करायचा का ऑफस्पिनर ब्रेसवेलला संघात घ्यायचे हा एक विचार न्यूझीलंड करेल. पाकिस्तानचे हॅरिस, शादाब आणि मसूद जरी फिरकीला चांगले खेळात असले तरी रिझवान आणि बाबरचा ऑफ स्पिनरच्या विरुद्धचा स्ट्राईक रेट चांगला नाही. (T-20 World Cup)

पाकिस्तानने फलंदाजी घेतली तर रिझवानला रोखायला पॉवर प्ले मध्ये न्यूझीलंड फिरकीचा मारा करू शकते. 1992 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखायला दीपक पटेलने गोलंदाजीची सुरुवात केली होती. तसेच डावपेच पाकिस्तानला चकित करायला न्यूझीलंड वापरू शकते. न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना सापळ्यात पकडायला शॉर्ट ऑफ गुडलेंग्थ गोलंदाजी करणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी या स्पर्धेत आखूड टप्प्याची गोलंदाजी बाकीच्या संघाच्या मानाने कमी केली आहे. पण त्यांना पाकिस्तानसाठी आपली लेंग्थ बदलावी लागेल. याउलट हॅरिस रौफ या लेंग्थचा उत्तम वापर करत आहे.

भारतापासून सर्वच संघांना त्याने सतावले आहे आणि त्यामुळेच शाहिन आफ्रिदीपेक्षा तो घातक आहे. या खेळपट्टीवर न्यूझीलंडला इश सोधी आणि सॅन्टनरकडून खूप अपेक्षा आहेत. डावाची मधली षटके टाकताना शादाबसारख्याला रोखायला त्यांचे कसब पणाला लागेल.
मंगळवारी न्यूझीलंडने कसून सराव केला; तर पाकिस्तानने सरावाला सुटी दिली. सामन्याच्या आदल्या दिवशी सरावाला सुटी देण्यात पाकिस्तानचा उद्देश हाच आहे की, खेळाडू ताजेतवाने असले तर त्यांचा नैसर्गिक खेळ करून ते आपली सर्वोत्तम कामगिरी करतील. एका अतिशय शिस्तबद्ध आणि प्रक्रियेतून आलेल्या न्यूझीलंड विरुद्ध नेहमीच स्ट्रीट स्मार्ट आणि अगदी नैसर्गिक खेळ करणार्‍या पाकिस्तानचा या सामन्यात शिस्तबद्धता का नैसर्गिकता जिंकते हे कळून येईल.

3
पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यात दोनवेळा वन-डे वर्ल्डकप आणि एकदा टी-20 वर्ल्डकप अशी तीनवेळा सेमीफायनलमध्ये गाठ पडली आहे. यामध्ये प्रत्येकवेळी पाकने बाजी मारली आहे. हेच रेकॉर्ड कायम राखण्याचा बाबर आझम बुधवारी प्रयत्न करेल.

1992
साली झालेल्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान व न्यूझीलंड हे संघ सेमीफायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते. हा सामना पाकने 4 विकेटने जिंकला होता. तर 1999 च्या वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये पाकने न्यूझीलंडला 9 विकेटने पराभूत केले होते. त्यानंतर 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतही सेमीफायनलमध्ये पाकने न्यूझीलंडला 6 विकेटने पराभूत केले होते.

0
न्यूझीलंड संघाला आतापर्यंत टी-20 अथवा वन-डे वर्ल्डकपचे एकदाही जेतेपद मिळविण्यास यश आलेले नाही. मात्र किवी संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स चषक जिंकला आहे. तर पाकने 1992 मध्ये वन-डे वर्ल्डकप व 2009 मध्ये टी-20 वर्ल्डकप स्पर्धा जिंकली आहे.

निमिष पाटगावकर

Back to top button