स्मृती मानधना हिची ‘बिग बॅश’मधून माघार? | पुढारी

स्मृती मानधना हिची ‘बिग बॅश’मधून माघार?

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आगामी महिला बिग बॅश लीगमधून माघार घेण्याचा विचार करीत आहे. वर्कलोड मॅनेज करण्यासाठी आणि दुखापत टाळून भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिकाधिक योगदान देता यावे, यासाठी स्मृतीने हा निर्णय घेण्याचा विचार सुरू केला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत सध्या ती खेळते आहे. ती म्हणाली, वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सातत्याने क्रिकेट सुरू आहे. परंतु कोरोना काळात फार क्रिकेट झाले नसल्याने मी सर्व सामने खेळण्यासाठी फिट राहण्याचा प्रयत्न करतेय. महिला क्रिकेटपटू म्हणून मला असेच वेळापत्रक हव होते. त्यात आम्हाला आता मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती राखायची आहे. त्यामुळेच मी बिग बॅशमधून माघार घेण्याचा विचार करीत आहे. दुखापतीमुळे भारताच्या एकाही सामन्याला मला मुकायचे नाही.

2022 मध्ये फेब—ुवारीत न्यूझीलंड दौर्‍यानंतर मार्चमध्ये वन डे वर्ल्ड कप, एप्रिल-मे महिन्यात स्थानिक क्रिकेट, त्यानंतर जून-जुलैमध्ये वन डे व ट्वेंटी-20 मालिकेसाठी श्रीलंका दौरा, जुलै-ऑगस्टमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असे सतत क्रिकेट स्मृती खेळत आहे. बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रौप्यपदकाची कमाई केली. त्यानंतर स्मृती मानधना इंग्लंडमध्ये महिलांच्या दि हंड्रेड लीगसाठी थांबली.

स्मृतीने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 2215, वन डे मध्ये 2892 व कसोटीत 325 धावा केल्या आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताची ती आघाडीची फलंदाज आहे. कसोटीत तिच्या नावावर विक्रमी शतकही आहे. अशात तिने भारतीय क्रिकेटला अधिकाधिक वेळ देता यावा यासाठी फ्रँचायझी क्रिकेटकडे पाठ फिरवण्याचीही तयारी दर्शवली आहे.

Back to top button