Team India : टी 20 वर्ल्ड कप संघात ‘या’ 11 खेळाडूंना मिळणार संधी! | पुढारी

Team India : टी 20 वर्ल्ड कप संघात ‘या’ 11 खेळाडूंना मिळणार संधी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिका, आयर्लंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे मालिकेशिवाय भारतीय संघाने (Team India) आशिया कप (Asia Cup) स्पर्धेपर्यंत सर्व पर्याय आजमावले आहेत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी 20 (T20) वर्ल्ड कपकडे नजर टाकली तर भारतीय संघासाठी प्रयोगांची वेळ आता संपली आहे.

आता टी 20 वर्ल्ड कपसाठी 15 जणांचा अंतिम संघ निवडण्याची आणि या जागतिक स्पर्धेपूर्वी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत आजमावण्याची हीच वेळ आहे. गेल्या 3-4 महिन्यांत भारतीय संघ व्यवस्थापनाने अनेक खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली. या सर्व प्रयोगांनंतर एक महत्त्वाची बाब समोर येत आहे. वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात (Team India) 4 खेळाडूंची जागा पक्की झाल्याचे निश्चित आहे. पण 11 खेळाडूंबाबत गोंधळ कायम आहे.

कोण आहेत ‘ते’ 4 खेळाडू?

वर्ल्ड कप संघात ज्या 4 खेळाडूंनी आपली जागा पक्की केली आहे त्यात कर्णधार रोहित शर्मा, इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव, स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा आहे. क्रिकेट तज्ज्ञांनीही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. हे चारच नव्हे तर हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, केएल राहुल असे काही खेळाडू आहेत ज्यांचे स्थान आपण निश्चित मानू शकतो. पण यातील काही खेळाडू दुखापतींशी तर काही संघातील प्रतिस्पर्ध्याशी झुंज देत आहेत. कार्तिक आणि पंत यांच्यापैकी एकालाच स्थान मिळते. तर बुमराह आणि हर्षल जखमी झाले आहेत. मात्र, या सर्व अंदाजांवर 16 सप्टेंबर रोजी परिस्थिती स्पष्ट होऊ शकते.

असा असेल टीम इंडियाचा संभाव्य संघ (Team India)

फलंदाज : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा,
यष्टिरक्षक : ऋषभ पंत, दिनेश कार्तिक
अष्टपैलू : अक्षर पटेल, हार्दिक पंड्या
गोलंदाज : भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग/मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन

16 ऑक्टोबरपासून क्वालिफायर सुरू होणार…

टी 20 वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतून या स्पर्धेत 4 संघ सहभागी होतील. यावेळी माजी विश्वविजेते श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे संघांना पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे. त्यांच्याशिवाय झिम्बाब्वे, आयर्लंड, यूएई, स्कॉटलंड, नामिबिया आणि नेदरलँड्स हे संघही पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत.

यावेळी ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. मुख्य फेरीतील टॉप-8 संघ निश्चित झाले आहेत. पात्रता फेरीतून चार संघ येतील. यानंतर, 6-6 संघ दोन गटात विभागले जातील आणि प्रत्येकी पाच साखळी सामने खेळतील. यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. 23 ऑक्टोबरपासून मुख्य फेरी सुरू होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे.

Back to top button