Shahid Afridi : भारत-पाक हाय-व्होल्टेज सामन्यात आफ्रिदीच्या मुलीने फडकवला ‘तिरंगा’! | पुढारी

Shahid Afridi : भारत-पाक हाय-व्होल्टेज सामन्यात आफ्रिदीच्या मुलीने फडकवला 'तिरंगा'!

पुढारी ऑनलाईन डेस्क : युएईमध्ये खेळल्या जात असलेल्या आशिया कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने खेळले गेले. स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघने हाँगकाँगवर सहज मात करून स्पर्धेच्या सुपर फेरीत आरामात प्रवेश केली. तर पाकिस्तानने हाँगकाँवर विजय मिळवून सुपर 4 फेरीत एन्ट्री घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा भारत पाकिस्तान आमने-सामने आले. पण या सामन्यात बाबर आझमच्या संघाने रोहित ब्रिगेडला 5 विकेट्सनी मात दिली.

भारतीय संघाने सुपर 4 फेरीत सलग दोन पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि दुस-या सामन्यात श्रीलंकेने रोहित ब्रिगेडला मात दिली. तर तिस-या सामन्यात विराट कोहलीच्या 71 व्या शतकाच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. तर दुसरीकडे, सुपा 4 मधील पाकिस्तान आणि श्रीलंकेने प्रत्येकी दोन-दोन सामने जिंकल्यामुळे या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली. या दोन्ही संघांमध्ये रविवारी (दि. 11) फायनल रंगणार आहे. त्यामुळे आशिया क्रिकेटचा कोण किंग ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सुपर 4 फेरीतील सामन्यात घडलेल्या एका घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चला तर जाणून घेऊया काय अहे ती घटना…

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे की, त्याच्या लहान मुलीने 4 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारताचा झेंडा फडकावला होता. आफ्रिदीने समा टीव्हीला सांगितले की, त्याचे कुटुंबीय सामना पाहण्यासाठी 4 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गेले होते. आफ्रिदीच्या म्हणण्यानुसार, त्याला त्याच्या पत्नीने सांगितले होते की, सामना पाहण्यासाठी आलेले 90 टक्के चाहते हे भारतीय समर्थक आहेत.

शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘होय मला कळले की तिथे जास्त भारतीय चाहते आहेत. माझे कुटुंब तिथे बसले होते. मला व्हिडिओ पाठवले जात होते जे मी पाहत होतो. माझी पत्नी मला सांगत होती की इथे फक्त 10 टक्के पाकिस्तानी प्रेक्षक आहेत, बाकीचे 90 टक्के भारतीय आहेत. पाकिस्तानचा झेंडाही तिथे उपलब्ध नव्हता, त्यामुळे माझी धाकटी मुलगी हातात भारताचा तिरंगा फडकवत होती. माझ्याकडे व्हिडिओ आहेत. ट्विट करावे की नाही, असा प्रश्न पडला होता. मग वाटलं हा विषय सोडून द्यावा.’

शाहिद आफ्रिदी वादात सापडला (Shahid Afridi)

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या भारतविरोधी वक्तव्यामुळे चर्चेत असतो. पण त्याचा नवा दावा धक्कादायक आहे. काही महिन्यांपूर्वी शाहिद आफ्रिदीने भारताला पाकिस्तानचा शत्रू देश म्हटले होते. त्यानंतर आफ्रिदीने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख यासिन मलिकच्या समर्थनार्थ वादग्रस्त ट्विट केले होते.

शाहिद आफ्रिदीही त्याच्या वयामुळे वादात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनुसार, आफ्रिदीचा जन्म 1 मार्च 1980 रोजी झाला, म्हणजेच त्याचे वय 42 वर्षे आहे. 2019 मध्ये, आफ्रिदीने मोठा खुलासा केला होता ही, 1996 मध्ये नैरोबी येथे श्रीलंकेविरुद्ध 37 चेंडूत विक्रमी शतक झळकावले तेव्हा मी 16 वर्षांचा नव्हतो.

शाहिद आफ्रिदीचा आंतरराष्ट्रीय विक्रम

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने 27 कसोटी सामन्यांमध्ये 1716 धावा केल्या असून 48 विकेट घेतल्या आहेत. शाहिद आफ्रिदीच्या नावावर 398 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8064 धावा व्यतिरिक्त 395 बळी आहेत. स्टार अष्टपैलू खेळाडू असलेल्या शाहिद आफ्रिदीने 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले, त्यात 1416 धावा केल्या आणि 98 विकेट घेतल्या.

पाकिस्तान-श्रीलंका फायनल…

पाकिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर भारत आशिया चषक सुपर 4 मधील पहिले दोन सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सुपर फोरमधील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ श्रीलंकेकडून पराभूत झाला असला तरी रविवारी होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होऊ शकते. दुबईच्या मैदानावर टॉसची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. महत्त्वाच्या सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Back to top button