‘पंजाब किंग्ज’ प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना नारळ देणार? | पुढारी

‘पंजाब किंग्ज’ प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना नारळ देणार?

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघ आता नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा करार संपत आला असून, अशा परिस्थितीत फ्रँचायझी त्यांच्यासोबत करार पुढे करण्यास इच्छुक नसल्याची बातमी येत आहे. अलीकडेच कोलकाता नाईट रायडर्सने ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी चंद्रकांत पंडित यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आता प्रीती झिंटाची टीम पंजाब किंग्जसुद्धा मोठा बदल करताना दिसू शकते.

पंजाब किंग्जच्या संघाला आजपर्यंत आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. इतकेच नाही, तर 2014 च्या आयपीएलपासून हा संघ प्लेऑफमध्येही पोहोचलेला नाही. आयपीएल 2014 मध्ये पंजाब किंग्जचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि उपविजेते म्हणून थांबला, ही त्यांची आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी आहे. अनिल कुंबळे यांच्या प्रशिक्षणाखाली पंजाब संघाने 42 पैकी केवळ 19 सामने जिंकले आहेत.

गेल्या हंगामात पंजाब फ्रँचायझीमध्ये लियाम लिव्हिंगस्टोन, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो आणि कागिसो रबाडा या खेळाडूंचा समावेश होता; पण तरीही संघ 14 पैकी केवळ 7 सामने जिंकू शकला आणि सहाव्या क्रमांकावर राहिला.

Back to top button