आफ्रिदी सचिनचा अपमान करीत होता तो शांतपणे अख्तरला फोडत होता : वीरेंद्र सेहवाग | पुढारी

आफ्रिदी सचिनचा अपमान करीत होता तो शांतपणे अख्तरला फोडत होता : वीरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : 2003 च्या वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यात शाहिद आफ्रिदी सचिन तेंडुलकरला अपमानास्पद बोलून उसकवण्याचा प्रयत्न करीत होता; पण सचिन शांतपणे पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत होता, अशी आठवण वीरेंद्र सेहवागने सांगितली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा कायम ‘हाय व्होल्टेज’ सामना असतो. आता 28 ऑगस्ट रोजी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 वर्ल्डकपमध्येदेखील भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची परवणी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर वीरेंद्र सेहवाग याने भारत-पाकिस्तान सामन्यातील एका जुन्या आठवणीला उजाळा दिला.

वीरेंद्र सेहवागने 2003 च्या वन-डे वर्ल्डकपमधील लीग स्टेजमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यातील एक किस्सा सांगितला. या सामन्यात भारताचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने 75 चेंडूंत 98 धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्याने शोएब अख्तरच्या पहिल्याच षटकात 18 धावा चोपून त्याची बॉलिंग बंद केली होती. भारताने पाकिस्तानचे 274 धावांचे आव्हान सहा विकेट राखून पार केले होते. मात्र, या सामन्यात सचिन तेंडुलकरला रनर घ्यावा लागला होता.

या सामन्याबाबत बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, सचिन तेंडुलकरच्या पायात गोळे येत होते. त्यामुळे त्याने मला रनर म्हणून मैदानावर परत बोलावले. दरम्यान, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी सचिन तेंडुलकरचा सातत्याने अपमान करत होता. तो सतत काही ना काही बोलत होता. मात्र, सचिन तेंडुलकरची एकाग्रता ढळली नव्हती. त्याला माहिती होते की, त्याचे क्रीजवर असणे किती महत्त्वाचे आहे. तो सहसा रनर घेत नव्हता. मात्र, त्यावेळी त्याने मला मैदानात रनर म्हणून बोलावले. त्याला माहिती होते की, मी त्याच्यासारखाच धावेन. आमच्यामध्ये कोणताही गोंधळ होणार नाही.

Back to top button