भारत-पाक सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार | पुढारी

भारत-पाक सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार

दुबई ; वृत्तसंस्था : 28 ऑगस्ट रोजी संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यासाठीची तिकीट विक्री सुरू होताच, चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या. तिकीट विक्रीची वेबसाईटही क्रॅश झाली. या वेबसाईटच्या ट्रॅफिकमध्ये 70 हजारांची वाढ झाली. तिकिटांची वाढती मागणी बघता काळाबाजार तेजीत सुरू झाला आहे.

सामना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तिकिटांची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेऊन काही चाहत्यांनी तिकिटांची पुनर्विक्री करून काळाबाजार सुरू केला आहे. काही चाहते दुप्पट-तिप्पट किमतीला भारत-पाक लढतीची तिकिटे विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे लक्षात येताच, अधिकार्‍यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. यूएईमधील सर्वात लोकप्रिय वेबसाईटपैकी एक असलेल्या ‘प्लॅटिनमलिस्ट डॉट नेट’ (झश्ररींळर्पीाश्रळीीं.पशीं) या ठिकाणी अधिकृत तिकीट विक्री सुरू आहे. ‘प्लॅटिनम लिस्ट’ने म्हटले आहे की, सरकारी नियमांनुसार तिकिटांची पुनर्विक्री बेकायदेशीर आहे. अशी तिकीटे आढळल्यास ती आपोआप रद्द होतील.

‘प्लॅटिनम लिस्ट’ने ‘खलीज टाईम्स’च्या माध्यमातून सांगितले की, ग्राहकांनी तथाकथित दुय्यम तिकीट विक्री वेबसाईट किंवा पुन्हा विकली जाणारी तिकिटे खरेदी करू नयेत. अशी तिकिटे मैदानात प्रवेश घेण्यासाठी वैध नसतील. याशिवाय, जर एखाद्या ग्राहकाने एकाच सामन्यासाठी एकापेक्षा जास्त तिकिटे खरेदी केली असतील, तर त्याने किंवा त्याच्यासोबतच्या लोकांनी मैदानात एकत्र प्रवेश केला पाहिजे.

Back to top button