नीरज चोप्रा : आता लक्ष सुवर्णपदकावर | पुढारी

नीरज चोप्रा : आता लक्ष सुवर्णपदकावर

नवी दिल्‍ली ; वृत्तसंस्था : ऑलिम्पिकपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भालाफेकीत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. पात्रता फेरीसाठी 24 वर्षीय नीरज चोप्रा ‘अ’ गटामध्ये होता. भाला फेकण्यासाठी पहिला क्रमांक नीरज चोप्राचा होता. युजीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी 83.50 मीटर अंतर पार करण्याची आवश्यकता असते. ‘अ’ गटात नीरज चोप्राची कामगिरी सर्वोत्तम ठरली. या गटातून टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकूब व्हॅडलेच यानेही फायनल गाठली.

नुकतेच नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये रौप्य पदक जिंकत नवा राष्ट्रीय रेकॉर्ड केला. नीरज चोप्राने 89.94 मीटर अंतर पार भालाफेक केली. ऑगस्ट 2018 मध्ये झुरिच येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने चौथे स्थान मिळवले होते. त्यावेळी त्याने 85.73 मीटर अंतरावर भाला फेकला होता.

तसेच तुर्कू (फिनलंड) येथे झालेल्या पोव्हो नुर्मी क्रीडा स्पर्धेत 24 वर्षीय नीरजने राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत 89.30 मीटर भाला फेकून रौप्यपदक पटकावले. मग क्युर्टाने क्रीडा स्पर्धेत आव्हानात्मक वातावरणाचा सामना करीत नीरजने 86.30 मीटर अंतर गाठत सुवर्ण पदकाची कमाई केली. तुर्कू येथील स्पर्धेत क्युर्टानेपेक्षा अधिक तारांकित खेळाडू सहभागी झाले होते. पावसामुळे मैदान निसरडे झाल्यामुळे तिसर्‍या प्रयत्नात नीरज घसरला; परंतु सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

भारताची भालाफेकपटू अन्‍नू राणीने गुरुवारी अखेरच्या प्रयत्नात 59.60 मीटर अंतरावर भाला फेकून जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अन्‍नूने पहिल्या प्रयत्नात सदोष फेक केली, तर दुसर्‍या प्रयत्नात 55.35 मीटर अंतर गाठले. त्यामुळे तिचे आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात येण्याची चिन्हे होती; परंतु अखेरच्या प्रयत्नात तिने 59.60 मीटर अंतर गाठले जे यंदाच्या हंगामातील तिच्या 63.82 मीटर या सर्वोत्तम कामगिरीइतके नसले, तरी अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुरेसे होते.

Back to top button