भारताचे आता ‘मिशन वेस्ट इंडिज’ ; पहिली वन-डे उद्या | पुढारी

भारताचे आता ‘मिशन वेस्ट इंडिज’ ; पहिली वन-डे उद्या

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : इंग्लंडला टी-20 व वन-डे मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी धवनसेना वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान होणार्‍या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (22 जुलै) होणार आहे. त्यानंतर पाच टी-20 सामन्यांची मालिका होईल. तसे पाहिल्यास भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपर्यंत एकूण 136 वन-डे सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाचे पारडे जड आहे. भारताने 67 सामने जिंकले आहेत. तर 63 सामन्यांत वेस्ट इंडिजने बाजी मारली आहे. चार सामन्यांचा निकाल लागला नसून दोन सामने टाय झाले आहेत.

भारताने मायदेशात वेस्ट इंडिजला 32 सामन्यांत पराभूत केले आहे. तर वेस्ट इंडिजने 20 विजय मिळविले आहेत. टीम इंडियाने वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन संघाला आतापर्यंत 16 सामन्यांत धूळ चारली आहे. तर वेस्ट इंडिजने आपल्या देशात भारताला 28 वेळा पराभूत केले आहे. याशिवाय दोन्ही संघांदरम्यान त्रयस्थ ठिकाणी अनेक सामन्यांत गाठ पडली आहे. यादरम्यान भारताने 19 तर वेस्ट इंडिजने 15 सामन्यांत विजय मिळविला आहे.

पूरन म्हणतो, आमचे काम सोपे

वेस्ट इंडिज दौर्‍यावर आलेल्या भारताच्या वन-डे संघात दिग्गज खेळाडू सहभागी नसल्याने आमचे काम सोपे झाले आहे, असे मत कॅरेबियन संघाचा कर्णधार निकोलस पूरनने व्यक्त केले आहे. भारतीय संघात बडे खेळाडू नसले तरी नवोदित खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाला कमी लेखले जाऊ शकत नाही. भारताकडे असे असंख्य खेळाडू आहेत की, ते बड्या खेळाडूची भूमिका पार पाडू शकतात, असेही पूरनने सांगितले.

भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल

नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने संघाची जबाबदारी डावखुरा सलामी फलंदाज शिखर धवनवर सोपविण्यात आली आहे. तर टी-20 मालिकेत रोहित शर्मा खेळणार आहे. दरम्यान, भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला आहे. कर्णधार धवनने यासंबंधीचा एक मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ विमानतळावरचा असून त्यामध्ये संपूर्ण संघ पूर्ण टशनमध्ये असल्याचे दिसून येत आहे. यात धवनचा स्टंट लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये प्रशिक्षक राहुल द्रविडची एंट्रीही आहे. या व्हिडीओवर दिनेश कार्तिकने कॉमेंट करत लिहिले आहे की, केवळ शिखरच असा स्टंट करू शकतो. बॉलीवूड स्टार रणवीर सिंहनेही हा व्हिडीओे पाहून त्यास नंबर वन असे म्हटले आहे.

क्षमता सिद्ध करण्याची संधी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे मालिकेत कर्णधार रोहितसह विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या या बड्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे शुभमन गिल, ईशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह या नवोदितांना क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

Back to top button