खेळाडूंच्या ब्रेकवरून सौरव गांगुलीचा चिमटा | पुढारी

खेळाडूंच्या ब्रेकवरून सौरव गांगुलीचा चिमटा

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : वर्कलोडमुळे आता एक मालिका खेळल्यानंतर अनेक सीनियर खेळाडू विश्रांती मागत असल्याची तक्रार बीसीसीआयने केली आहे. त्यात आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती हवी असल्याचा अर्ज विराट कोहलीने केल्याची चर्चा आहे. त्यात बीसीसीआय अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली याने महत्त्वाचे विधान केले आहे. आपण 13 वर्षे नॉनस्टॉप खेळलो असल्याची आठवण गांगुली याने करून दिली आहे.

2005 मध्ये गांगुलीच्या कारकिर्दीला उतरती कळा आली आणि त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. तो आयुष्यातील सर्वात खडतर काळ असल्याचे गांगुलीने मान्य केले. तो म्हणाला, त्यावेळी स्थानिक क्रिकेट खेळणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक नव्हते, परंतु जी परिस्थिती होती ती टफ होती. माझे त्यावर नियंत्रण नव्हते. मी भारतासाठी सलग 13 वर्षे विश्रांती न घेता खेळलो. मी एकही मालिका किंवा दौरा मिस केला नाही. आता अनेक खेळाडू विश्रांती घेतात. पण मी माझ्या कारकिर्दीत कधीच घेतली नाही. त्यामुळे माझ्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सलग 13 वर्षांनंतर संघाबाहेर होते तो 4-6 महिन्यांचा काळ मी ब्रेक असा मानतो.

एक मालिका खेळले की हे सीनियर खेळाडू विश्रांतीची मागणी करत असल्याचा आरोप बीसीसीआयच्या सूत्रांनी केला आहे. निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत वर्कलोड व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित होतो. रोहित, कोहली, पंड्या, बुमराह आणि शमी हे खेळाडू नेहमीच विश्रांतीची गरज असल्याचे सांगतात.

Back to top button