India vs Ireland : भुवनेश्वर कुमारने रचला इतिहास, T20 च्या पॉवरप्लेमध्ये केला ‘हा’ जागतिक विक्रम! | पुढारी

India vs Ireland : भुवनेश्वर कुमारने रचला इतिहास, T20 च्या पॉवरप्लेमध्ये केला 'हा' जागतिक विक्रम!

डब्लिन (आयर्लंड) : पुढारी ऑनलाईन; भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने T20 फॉरमॅटच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. भुवनेश्वरने रविवारी आयर्लंडविरुद्ध (India vs Ireland) मालाहाइड क्रिकेट क्लब (Malahide Cricket Club Ground) मैदानावर खेळलेल्या पहिल्या T20 सामन्यात ही कामगिरी केली. त्याने डावातील पाचव्या चेंडूवर आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालब्रीनला बाद केले आणि त्याने T20I मध्ये ३४वी पॉवरप्ले विकेट पूर्ण केली. या विकेटसह भुवनेश्वरने वेस्ट इंडिजचा माजी फिरकी गोलंदाज सॅम्युअल बद्री (former West Indies spinner Samuel Badree) आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी (New Zealand pacer Tim Southee यांना मागे टाकले. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये प्रत्येकी ३३ बळी घेतले आहेत.

India vs Ireland : डब्लिन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने आयर्लंडवर ७ विकेट व १६ चेंडू राखून सहज विजय मिळवला. पावसामुळे प्रत्येकी बारा षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. आयर्लंडने पहिल्यांदा खेळताना १२ षटकात ४ बाद १०८ धावा केल्या. भारताने हे आव्हान ९.२ षटकांत पूर्ण केले. आयर्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशन आणि दीपक हुडा यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. इशानने नेहमीप्रमाणे आक्रमक फटके खेळले. किशनने ११ चेंडूत २६ धावा केल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार शून्यावर पायचित झाला. कर्णधार हार्दिक पंड्या (२४) आणि दीपक हुडा (नाबाद ४७) यांनी अर्धशतकी भागीदारी करुन सामना ताब्यात आणला. तत्पूर्वी, भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्‍वरकुमारने पहिल्या षटकातच आयर्लंडला धक्‍का दिला. त्याने अँड्र्यू बालब्रीन याचा शून्यावर त्रिफळा उडवला.

त्यानंतर दुसर्‍या षटकात कर्णधार हार्दिक पंड्याने पॉल स्टर्लिंगला (४) बाद केले. चौथ्या षटकांत आवेश खानने गेराथ डिलाने (८) याला तंबूत धाडले. हॅरी टेक्टॉर आणि लोरकन टकेर या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. यांच्या भागीदारीमुळे आयर्लंडने १२ षटकात ४ बाद १०८ धावा केल्या. टेक्टॉर ६४ धावांवर नाबाद राहिला. पदार्पण करणार्‍या उमरान मलिकने निराशा केली. त्याने पहिल्याच षटकात १४ धावा दिल्या. जम्मू-काश्मीरचा बहुचर्चित स्पीडस्टार उमरान मलिक याला अखेर राष्ट्रीय संघाचे दरवाजे खुले झाले. डब्लिन येथे आयर्लंड विरुद्ध होणार्‍या पहिल्या टी-20 सामन्यात उमरानने पदार्पण केले. भुवनेश्‍वर कुमार याच्या हस्ते त्याला टीम इंडियाची कॅप देण्यात आली.

T20I क्रिकेटच्या पॉवरप्लेमधील सर्वाधिक विकेट्स

भुवनेश्वर कुमार- ३४ विकेट
सॅम्युअल बद्री- ३३ विकेट
टीम साऊदी- ३३ विकेट
शाकिब अल हसन- २७ विकेट
जोश हेजलवूड- २७ विकेट

Back to top button