Ireland tour : आयपीएल गाजवूनही आयर्लंड दौर्‍याला मुकलेले यंगस्टार | पुढारी

Ireland tour : आयपीएल गाजवूनही आयर्लंड दौर्‍याला मुकलेले यंगस्टार

आयर्लंड दौर्‍यासाठी (Ireland tour) भारतीय क्रिकेट संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. भारताचा प्रमुख वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यासाठी गेला असताना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना आयर्लंडमध्ये पाठवण्यात आले आहे. या संघात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील खेळाडूंचा बहुतांश समावेश असला तरी काही फेरबदल आहेत. संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव यांचे पुनरागमन झाले आहे. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा इंग्लंडमध्ये खेळणार असल्याने आयर्लंडसाठी त्याची निवड करण्यात आलेली नाही, पण या सगळ्यात एक नाव मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे राहुल त्रिपाठी.

आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही निवड समितीच्या नजरेपासून वंचित राहिलेल्या राहुलला शेवटी राष्ट्रीय संघाचे दार उघडले. त्याला अंतिम 11 जणांत किती संधी मिळेल ही शंका असली तरी त्याला राष्ट्रीय संघाचा उंबरठा ओलांडता आला हेही नसे थोडके. कारण, आयपीएलमध्ये किंवा स्थानिक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून अनेक जणांना आयर्लंडच्या विमानाचे तिकीट मिळाले नाही. त्यामानाने राहुल त्रिपाठी सुदैवी ठरला. म्हणून असे संधी न मिळालेले खेळाडू कोण कोण आहेत, ते जाणून घेऊ. (Ireland tour)

पृथ्वी शॉ :

मुंबई रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ याला आतापर्यंत एकच आंतरराष्ट्रीय टी-20 खेळण्याची संधी मिळाली आहे. कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचे भाग्य लाभलेल्या पृथ्वी टी-20 मध्ये पहिल्याच चेंडूवर बाद झाला. आयपीएलमध्ये त्याने 147 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या अनेक विजयात त्याने दिलेली वेगवान सुरुवात फायदेशीर ठरली आहे. मुश्ताक अली, विजय हजारे स्पर्धेत चमकूनही त्याच्याकडे आयलर्र्ंडसाठी दुर्लक्ष करण्यात आले.

नितीश राणा :

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांतील मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून नितीश राणा याने नाव कमावले आहे. डाव्या हाताने बेधडक फलंदाजी करणार्‍या नितीशला गेल्यावर्षी श्रीलंका दौर्‍यात पदार्पणाची संधी मिळाली होती; परंतु त्याला त्याचे सोने करता आले नाही. आयपीएल 2022 च्या कामगिरीवर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत निवड होईल असे वाटले होते. तेथेही त्याला निराशा मिळाली. ही त्याने सोशल मीडियावर व्यक्त केली होती. यानंतर आयलर्र्ंड दौर्‍यातही तो आता संघात नसणार आहे.

टी नटराजन :

यॉर्कर स्पेशालिस्ट टी नटराजन याला 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने आतापर्यंत चार टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर 7 विकेटस् आहेत. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून त्याने 11 सामन्यांत 18 विकेटस् मिळवूनही निवड समितीला खूश करण्यात त्याला यश आले नाही.

राहुल चहर :

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर युजवेंंद्र चहलचा वारसदार म्हणून राहुल चहर याला टी-20 वर्ल्डकप संघात संधी देण्यात आली. त्याने 7 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून दहा विकेटस् त्याच्या नावावर आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये तो पंजाबचा प्रमुख फिरकी गोलंदाज होता. त्याने 13 सामन्यांत 14 विकेटस् घेतल्या. तरीही आयर्लंड दौर्‍यात त्याला निवडण्यात आले नाही.

राहुल तेवतिया :

आयपीएल 2020 मध्ये राहुल तेवतिया हे नाव जगाला कळाले. राजस्थान रॉयल्ससाठी अशक्यप्राय कामगिरी करणारा फिनिशर अशी उपाधी त्याला मिळाली. आयपीएल 2022 गुजरात टायटन्ससाठी त्याने आपली उपाधी सार्थ ठरवली. संघातील फिनिशरच्या जागेसाठी आपली निवड होईल अशी त्याला आशा होती. तथापि, भारताकडे सध्या हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक हे दोन फिनिशर आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय निवडकर्त्यांना दुसरा फिनिशर निवडणे योग्य वाटले नसावे. आयर्लंड दौर्‍यासाठी निवड न झाल्याने राहुल तेवतियाने ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली.

Back to top button