

डब्लिन : पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे बाधित झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने आयर्लंडवर 7 विकेट व 16 चेंडू राखून सहज विजय मिळवला. पावसामुळे प्रत्येकी बारा षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. आयर्लंडने पहिल्यांदा खेळताना 12 षटकात 4 बाद 108 धावा केल्या. भारताने हे आव्हान 9.2 षटकांत पूर्ण केले.
आयर्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशन आणि दीपक हुडा यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. इशानने नेहमीप्रमाणे आक्रमक फटके खेळले. किशनने 11 चेंडूत 26 धावा केल्या. यानंतर पुढच्याच चेंंडूवर सूर्यकुमार शून्यावर पायचित झाला. कर्णधार हार्दिक पंड्या (24) आणि दीपक हुडा (नाबाद 47) यांनी अर्धशतकी भागीदारी करुन सामना ताब्यात आणला. तत्पूर्वी, भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वरकुमारने पहिल्या षटकातच आयलर्र्ंडला धक्का दिला. त्याने अँडी बालब्रीन याचा शून्यावर त्रिफळा उडवला.
त्यानंतर दुसर्या षटकात कर्णधार हार्दिक पंड्याने पॉल स्टर्लिंगला (4) बाद केले. चौथ्या षटकांत आवेश खानने गेराथ डिलाने (8) याला तंबूत धाडले. हॅरी टेक्टॉर आणि लोरकन टकेर या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. यांच्या भागीदारीमुळे आयर्लंडने 12 षटकात 4 बाद 108 धावा केल्या. टेक्टॉर 64 धावांवर नाबाद राहिला. पदार्पण करणार्या उमरान मलिकने निराशा केली. त्याने पहिल्याच षटकात 14 धावा दिल्या. जम्मू-काश्मीरचा बहुचर्चित स्पीडस्टार उमरान मलिक याला अखेर राष्ट्रीय संघाचे दरवाजे खुले झाले. डब्लिन येथे आयर्लंड विरुद्ध होणार्या पहिल्या टी-20 सामन्यात उमरानने पदार्पण केले. भुवनेश्वर कुमार याच्या हस्ते त्याला टीम इंडियाची कॅप देण्यात आली.