भारतीय महिला संघाची विजयी आघाडी | पुढारी

भारतीय महिला संघाची विजयी आघाडी

दाम्बुला : वृत्तसंस्था :  श्रीलंकन महिला क्रिकेट संघाने दुसर्‍या टी-20 सामन्यात ठेवलेले 126 धावांचे आव्हान भारताने 19.1 षटकांत 5 विकेटस्च्या मोबदल्यात पार केले. भारताने दुसरा टी-20 सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने 39, तर हरमनप्रीत कौरने नाबाद 31 धावा केल्या.

श्रीलंकेचे 126 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला 30 धावांवर पहिला धक्‍का बसला. सलामीवीर शेफाली वर्मा 10 चेंडूंत 17 धावा करून बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि सभिनेनी मेघना यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला; मात्र सुगंदिका कुमारीने मेघनाला 17 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर स्मृतीने हरमनप्रीत कौरबरोबर भागीदारी रचत संघाला 86 धावांपर्यंत पोहोचवले.

मात्र, स्मृती मानधना आपल्या अर्धशतकाजवळ पोहोचत असताना रणवीराने तिला 39 धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार कौरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत संघाला विजयापर्यंत पोहोचवले. तिने 30 चेंडूंत नाबाद 31 धावा केल्या. तिला यस्तिका भाटियाने 13 धावांची, तर दीप्‍ती शर्माने 5 आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 3 धावांची साथ दिली.

श्रीलंकेकडून रणसिंगे आणि रणवीरा यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणार्‍या श्रीलंकेने भारतासमोर 126 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून दीप्‍ती शर्माने दोन विकेटस् घेतल्या. तर रेणुका सिंह, राधा यादव, पूजा वस्त्राकर आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Back to top button