‘धोनीने शब्द पाळला, तो शब्दाचा पक्का’  | पुढारी

'धोनीने शब्द पाळला, तो शब्दाचा पक्का' 

रांची : पुढारी ऑनलाईन 

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्यानंतर त्याच्या ‘सायलेंट रिटायमेंट’च्या चर्चा देशभरात रंगू लागल्या. त्याच्या योगदानाबद्दल त्याचे आभार माननाऱ्या प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिल्या. पण, मित्रांनो ‘पिच्चर अभी बाकी है!’ कारण वर्ल्डकपनंतर आपली बॅट म्यान केलेल्या धोनीने आता ती बॅट पुन्हा बाहेर काढली आहे. त्याने झारखंडच्या रणजी संघाबरोबर सराव सुरु केला आहे. त्याच्या झारखंड येथील प्रशिक्षकांच्या मते त्याची बॅट आधीसारखीच तळपत आहे. 

अधिक वाचा : रोहित सुसाट, पण विराट अव्वल स्थानी कायम!

बीसीसीआयने धोनीला करारातून वगळल्यानंतर भारतात एकच चर्चा सुरु झाली. हा धोनीच्या निवृत्तीचा संकेत असल्याचे बोलले जाऊ लागले. पण, कूल धोनीने याला त्याच्या बॅटनेच उत्तर दिले. तो आता मैदानावर परतला असून इतक्या गॅपनंतरही त्याच्या बॅटला चांगले बॉल लागत असल्याचे मत त्याचे झारखंडमधील प्रशिक्षक राजीव कुमार यांना व्यक्त केले. ते म्हणाले, ‘गेल्या वेळी मी धोनीशी बोललो होतो त्यावेळी धोनीने मी जानेवारीत सरावाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले होते. त्याने त्याचा शब्द पाळला, तो शब्दाचा पक्का आहे.’ 

याचबरोबर कुमार त्याच्या फलंदाजीने दंग झाले आहेत. ते म्हणाले ‘इतक्या गॅपनंतर त्याचे शरीर थोडे अखडले असेल त्यामुळे त्याला सेट होण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता होती. पण, त्याने आल्या आल्या बॉल चांगले मिडल केले. त्याने जलदगती गोलंदाज आणि फिरकीलाही लिलया फलंदाजी केली. तो नेहमी जशी फलंदाजी करतो तसाच तो करत होता.’

अधिक वाचा : लेखिकेचा विराट – अनुष्कावर अश्लील जोक!

यंदाचा आयपीएल हंगाम हा धोनीची कारकिर्द ठरवणारा असण्याची शक्यता आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचे मालक एस. श्रीनिवासन यांनी धोनी हा हंगाम खेळेलच आणि पुढच्या हंगामातही आम्ही त्याला रिटेन करु असे सांगितले आहे.   

Back to top button