Arjun Tendulkar : विकेट नाही, पूरणने षटकार ठोकले, अर्जुन तेंडुलकरने अर्ध्यातच मैदान सोडले | पुढारी

Arjun Tendulkar : विकेट नाही, पूरणने षटकार ठोकले, अर्जुन तेंडुलकरने अर्ध्यातच मैदान सोडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) खेळण्याची संधी मिळाली. अर्जुनने या हंगामातील पहिला सामना खेळला, मात्र तो चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याला पहिल्याच षटकात विकेट मिळणार होती, पण रिव्ह्यू घेतल्याने मार्कस स्टोयनिस वाचला. यानंतर मैदानावर तो आक्रमक दिसला. यादरम्यान मार्कस स्टोयनिस सोबतच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हंगामातील शेवटच्या सामन्यात अखेर अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) प्लेइंग-११ मध्ये स्थान देण्यात आले. जसप्रीत बुमराहच्या जागी त्याला संघात संधी मिळाली. पहिली दोन षटके त्याच्यासाठी जबरदस्त होती, पण तिसऱ्या षटकात त्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. सामन्यादरम्यान अर्जुन तेंडुलकरच्या आक्रमक हावभावावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा स्टार मार्कस स्टोयनिसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

दुसऱ्या ओव्हरमध्ये अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करायला आला. मार्कस स्टोयनिस त्याच्यासमोर होता. षटकातील एक चेंडू मार्कस स्टोयनिसच्या पॅडला लागला, त्यावर अंपायरने त्याला बाद घोषित केले. अर्जुन आणि एमआयच्या खेळाडूंनी विकेटचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र स्टोयनिसने रिव्ह्यू घेतला तेव्हा प्रत्यक्षात चेंडू स्टंपवरून जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी हा निर्णय रद्दबातल ठरवला. षटकाचा पहिला चेंडू स्टोयनिसने थेट अर्जुनच्या दिशेने मारला. अर्जुनने आक्रमकपणे तो उचलला आणि स्टंपच्या दिशेने फेकण्याचे नाटक केले. या कृत्यामुळे स्टॉइनिस हसला आणि अर्जुनच्या दिशेने पाहत ओरडला. अर्जुनने चेंडू मारण्याचे हावभाव करून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. स्टोयनिसही यावेळी हसायला लागला. त्याच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया खूपच धक्कादायक होती.

अर्जुनने सामन्याच्या अर्ध्यातच मैदान सोडले

हार्दिकने १५ व्या षटकात खेळपट्टीवर आधीच पाय रोवलेल्या निकोलस पुरन आणि केएल राहुल यांच्यासमोर दुसऱ्यांदा अर्जुनकडे चेंडू सोपवला. पण षटक सुरू होण्यापूर्वीच अर्जुनच्या पायाच्या स्नायूंना ताण आला. फिजिओच्या मदतीनंतर अर्जुनने गोलंदाजी सुरू केली तेव्हा पहिले दोन चेंडू अचूकपणे टाकण्यात तो अपयशी ठरला. दोन्ही चेंडू फुल टॉस झाले आणि पूरणने षटकार ठोकला. यानंतर अर्जुन गोलंदाजी सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचे ओव्हर नमन धीरने पूर्ण केले. या षटकात लखनौने एकूण २९ धावा केल्या.

२२ धावांत एकही बळी नाही

अर्जुनने २.२ षटकात २२ धावा दिल्या मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याने स्पेलच्या पहिल्याच षटकात मार्कस स्टॉइनिसला एलबीडब्ल्यू आऊट केले, पण रिव्ह्यूनंतर तिसऱ्या पंचाने निर्णय बदलला. अर्जुनच्या आयपीएल कारकिर्दीतील हा सहावा सामना होता. अर्जुनला ६ सामन्यात ३ बळी घेता आले आहेत. त्याने ४५.३३ च्या सरासरीने आणि ९.३८ च्या इकॉनॉमीने या विकेट घेतल्या आहेत. ९ धावांत १ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

हेही वाचा : 

Back to top button