भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण दर्जेदारच : मॅकग्रा | पुढारी

भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण दर्जेदारच : मॅकग्रा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले असले तरीही ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या मते भारतीय  गोलंदाजी आक्रमण अजूनही जागतिक दर्जाचे आहे. इशांत शर्माने सामन्यात पाच विकेटस् मिळवल्या. तर, जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांना केवळ एक विकेट मिळवता आली.

‘भारताच्या गोलंदाजांवर माझा अजूनही विश्‍वास आहे. त्यामधील काही जणांना दुखापत होती. शर्माने पुनरागमन करीत पाच विकेटस् मिळवल्या. बुमराहला देखील दुखापत झाली होती. त्यानेही पुनरागमन केले. त्यामुळे भारताचे गोलंदाजी आक्रमण हे जागतिक दर्जाचे आहे आणि याबाबत शंका नाही. एका रात्रीत तुमची गोलंदाजी खराब होत नाही. या सामन्यात नाणेफेकही महत्त्वाची ठरली.

तसेच, न्यूझीलंडमधील वातावरण हे इंग्लंडप्रमाणे असल्याने त्यामुळे चेंडू चांगल्या पद्धतीने स्विंग होत होता,’ असे मॅकग्रा म्हणाला. मुंबईमध्ये आयोजित टुरिझम ऑस्ट्रेलिया कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. ‘इशांतकडे अनुभव आहे. गेल्या काही वर्षांत त्याने चांगली कामगिरी केली व ती कौतुकास्पद आहे. मला वाटले होते त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कारकीर्द संपली; पण त्याने स्वत:मध्ये सुधारणा केली आहे.


 

Back to top button