जय हनुमान, सुवर्णयुग स्पोर्टस् उपांत्य फेरीत | पुढारी

जय हनुमान, सुवर्णयुग स्पोर्टस् उपांत्य फेरीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुरुष व महिला खुले गट महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला विभागात जय हनुमान संघ बाचणी, सुवर्णयुग स्पोर्टस्, शिवशक्‍ती मुंबई व राजा शिवछत्रपती संस्था तर पुरुष विभागात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन, एनटीपीसी नंदुरबार, विजय स्पोर्टस् व सतेज संघ बाणेर या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा कोथरुड येथे सुरू आहे. महिलांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात हनुमान संघ बाचणी संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघावर 39-38 असा केवळ एक गुणाने विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना निर्धारित वेळेत 33-33 गुणांवर संपला. यानंतर हा सामना पाच-पाच चढायांमध्ये खेळला गेला. पाच-पाच चढायांमध्ये दोन्ही संघांनी एक-एक गुण देऊन सामना सुवर्ण चढाईवर नेणाची रणनीती आखली होती. मात्र, हनुमान संघ बाचणीच्या मृणाली टोणपे हिने एक चढाईत बोनससह गुण वसूल करीत एक गुणाची आघाडी घेतली आणि हा सामना जिंकला. 

पुरुष गटात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन संघाने इस्लामपूर व्यायाम मंडळ संघावर 38-19 असा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला बाबुराव चांदेरे संघाकडे 26-6 अशी निर्णायक आघाडी होती. बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन संघाच्या सिद्धार्थ देसाई व अक्षय जाधव यांनी चौफेर आक्रमण करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. एनटीपीसी नंदुरबार संघाने पुण्याच्या उत्कर्ष क्रीडा संस्था संघावर 29-27 असा निसटता विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला एनटीपीसी संघाकडे 17-10 अशा आघाडी होती. एनटीपीसी संघाच्या शिवराज जाधव दादासाहेब आवाड यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यांना निखिल शिंदे व शुभम बारमाटे यांनी चांगल्या पकडी घेतल्या. उत्कर्ष संघाच्या शुभम गायकवाड व बबलू गिरी यांनी खोलवर चढाया करीत प्रयत्नांची पराकाष्ठा केली.  

उपांत्यपूर्व फेरीचे इतर झालेले सामने : पुरुष विभाग सतेज संघ बाणेर वि.वि. आदिनाथ संघ (43-36), चेतक स्पोर्टस् वि.वि.महाराणा प्रताप पुणे (39-23), विजय स्पोर्टस् वि.वि. शिवशंकर (39-30) महिलांचे उपांत्यपूर्व  सामने-राजा शिवछत्रपती वि.वि.संघर्ष क्रीडा मंडळ (38-35), सुवर्णयुग स्पोर्टस् वि.वि. धर्मवीर प्रतिष्ठान (26-25).         

Back to top button