आता बचावात्मक खेळ नको | पुढारी | पुढारी

आता बचावात्मक खेळ नको | पुढारी

वेलिंग्टन : वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्ध 29 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटीपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने अतिबचावात्मक खेळ न करण्याचा सल्ला संघातील सहकार्‍यांना दिला आहे. विदेशी भूमीवर अशा प्रकारच्या खेळाने फायदा होत नसतो, असेही त्याने सांगितले आहे. 

पहिल्या कसोटीत ‘बेसिन रिझर्व्ह’वर भारताला न्यूझीलंडकडून 10 विकेटस्ने पराभव पत्करावा लागला. वेगवान गोलंदाजीला मदत करणार्‍या ‘बेसिन रिझर्व्ह’च्या खेळपट्टीवर भारतीय संघाला दोन्ही डावांत 200 चाही टप्पा पार करता आला नाही. यासंदर्भात बोलताना कोहली म्हणाला, आम्हाला आता योग्य तेच करावे लागणार आहे. जास्त सतर्क झाल्यास अथवा बचावात्मक धोरण अवलंबिल्यास जास्त लाभ मिळेल, असे मला वाटत नाही. कारण, अशा स्थितीत तुम्ही फटकेबाजी करू शकत नाही. 

पहिल्या कसोटीतील दुसर्‍या डावात पुजाराने अत्यंत बचावात्मक फलंदाजी केली. त्याने 81 चेंडूंत अवघ्या 11 धावा जमविल्या. तर, हनुमा विहारीने संथ फलंदाजी करताना 79 चेंडूंत 15 धावा काढल्या. भारतीय फलंदाजीला संपूर्ण सामन्यात सूरच गवसला नाही. पुजाराने तर सुरुवातीच्या 28 चेंडूंत एकही धाव काढली नव्हती. यामुळे दुसर्‍या बाजूने फलंदाजी करणार्‍या मयंक अग्रवालला फटकेबाजी करणे भाग पडत होते. चांगल्या चेंडूवर आपली विकेट जाणार हे निश्चित असते. त्यामुळे धावून धावा जोडण्यापेक्षा फटकेबाजी करणे जास्त चांगले, असे भारतीय कर्णधाराला वाटते. विराटच्या मते, ‘यामध्ये जर तुम्ही यशस्वी झाला नाही तरी तुमचा विचार योग्य होता, असा विचार केला पाहिजे. जर त्याचा फायदा झाला नाही तरी तुम्ही निदान प्रयत्न केल्यासारखे तरी वाटेल. यामुळे विदेशी खेळपट्ट्यांवर बचावात्मक खेळाने फायदा होत नाही.’ 

पहिली कसोटी गमावल्याने भारतीय संघ आता दोन सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने मागे पडला आहे. मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी तसेच टेस्ट चॅम्पियनशिपमधील गुणांची आकडेवारी सुधारून आपले अव्वल स्थान आणखी भक्कम करण्यासाठी विराट ब्रिगेडला दुसरी कसोटी जिंकावीच लागणार आहे. 

Back to top button