कोरोनाविरुद्ध एकत्र राहा; कठीण काळाचा सामना करा : सुनील छेत्री  | पुढारी

कोरोनाविरुद्ध एकत्र राहा; कठीण काळाचा सामना करा : सुनील छेत्री 

क्वालालंपूर : वृत्तसंस्था 

भारतीय कर्णधार सुनील छेत्री रविवारी आशियाई फुटबॉल परिषदेच्या (एएफसी) कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत पाहायला मिळाला. ‘तुम्हाला जे काही शक्य आहे ते या आव्हानात्मक काळात करा,’ असे छेत्री म्हणाला.एएफसीकडून राबविण्यात येणार्‍या ‘ब्रेक द चेन’ या अभियानात त्याच्यासोबत चीन फुटबॉल संघटनेचे (सीएफए) उपाध्यक्ष सून वेन आणि म्यानमारचे कर्णधार क्‍वाय जिन थेट सुद्धा होते.

हे अभियान या आठवड्यातच सुरू करण्यात आले होते. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी हे बनविण्यात आले असून, यामध्ये माजी भारतीय कर्णधार बायचुंग भुटियाचा देखील समावेश आहे. छेत्री आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल करण्याच्या यादीत फक्‍त ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मागे आहे. तर, सुपरस्टार लियोनेल मेस्सीच्या तो पुढे आहे.

‘या आव्हानात्मक काळाचा सामना सर्वांना करावा लागत आहे. जागतिक स्वास्थ्य संघटना आणि आपल्या स्थानिक सरकारकडून सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन करा हे आपल्याला सांगतो. तुम्ही यासाठी स्वच्छता राखा आणि घरातच राहा. आपण सर्वजण एकत्रितपणे टीम म्हणून काम करुयात जेणेकरून व्हायरस संक्रमणाची ही मालिका खंडित होईल. याचा प्रसार होणे थांबेल. मी याकरिता भारत व संपूर्ण जगातील लोकांच्या सोबत आहे. लवकरच गोष्टी सामान्य होतील याचा विश्‍वास आहे,’ असे सुनील छत्रीने सांगितले.

Back to top button