केकेआरची जोरदार मुसंडी | पुढारी | पुढारी

केकेआरची जोरदार मुसंडी | पुढारी

कोलकाता नाईट रायडर्ससाठी 2013 चा हंगाम चांगला गेला नव्हता. 2012 चे विजेतेपद पटकावणारा केकेआर 2013 मध्ये सातव्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र, 2014 च्या हंगामात केकेआरने जोरदार मुसंडी मारत आयपीएलवर दुसर्‍यांदा आपले नाव कोरले. त्यांनी अंतिम सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा 3 गडी राखून पराभव केला. केकेआरने अंतिम सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचे 199 धावांचे मोठे आव्हान पार केले. 2014 च्या हंगामात केकेआरबरोबरच किंग्ज इलेव्हन पंजाबनेही दमदार खेळ करीत पहिल्यांदाच आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती.

केकेआरने 2014 च्या सुरुवात अडखळत केली; पण साखळी फेरीच्या उत्तरार्धात केकेआरने जोरदार मुसंडी मारत सलग सात सामने जिंकण्याची किमया केली. मात्र, असे असले तरी त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवता आले नाही. हे स्थान किंग्ज इलेव्हन पंजाबने मिळवले. किंग्ज इलेव्हन पंजाबने पहिल्यांदाच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. त्यांनी आपले 14 पैकी 11 सामने जिंकून 22 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तर कोलकाता नाईट राईडर्सने 14 पैकी 9 सामने जिंकून 18 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. दुसर्‍या स्थानासाठी केकेआरची सीएसकेबरोबर चुरस झाली. दोघांनीही प्रत्येकी 9 सामने जिंकून 18 गुण मिळवले; पण केकेआरला सरस नेट रनरेटमुळे दुसरे स्थान मिळाले. त्यामुळे त्यांना क्वालिफायर सामना खेळण्याची संधी मिळाली. गुणतालिकेत 14 गुणांसह गतविजेती मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर राहिली.

पहिल्यांदाच क्वालिफायर सामना खेळणार्‍या किंग्ज इलेव्हन पंजाबचे फायनल गाठण्याचे स्वप्न केकेआरने लांबवले. प्रथम फलंदाजी करणार्‍या केकेआरने पंजाब समोर 163 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पंजाबला पेलवले नाही. त्यांना 20 षटकांत 135 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे आता किंग्ज इलेव्हन पंजाबला फायनल गाठण्यासाठी ‘करो या मरो’वाला दुसरा क्वालिफायर सामना खेळावा लागणार होता. दरम्यान, एलिमिनेटर सामन्यात चेन्‍नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. आता दुसर्‍या क्वालिफायरमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याची स्वप्ने पाहणार्‍या किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना पाच वेळचा आयपीएलचा अंतिम सामना खेळलेल्या चेन्‍नई सुपर किंग्ज बरोबर होणार होता; पण फायनलचा दांडगा अनुभव असलेल्या सीएसकेसमोर पंजाबने सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या दमदार 122 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर तब्बल 226 धावांचा डोंगर उभारला. या धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना सीएसकेनेही आपला सगळा दम लावला. सीएसकेने खराब सुरुवातीनंतर सुरेश रैनाच्या झुंजार 86 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबला कडवी टक्‍कर दिली. त्याला कर्णधार धोनीनेही नाबाद 42 धावांची खेळी करून साथ दिली; पण सीएसकेला 226 धावांचे मोठे आव्हान पार करता आले नाही. सीएसकेने  20 षटकांत 202 धावांपर्यंतच मजल मारली. त्यामुळे पंजाबने दुसर्‍या क्वालिफायर सामन्यात 24 धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच आयपीएलची फायनल गाठली.

आता किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार होता. पहिल्या क्वालिफायर सामन्यात केकेआरने पंजाबचा पराभव केला होता. त्यावेळी पंजाबची फलंदाजी म्हणावी तशी चांगली झाली नव्हती; पण पंजाबने यावेळी ती चूक सुधारली. पंजाबने एलिमिनेटर सामन्यातील आपल्या फलंदाजीचा फॉर्म कायम राखत 199 धावांचे आव्हान केकेआर समोर ठेवले. यामध्ये मोठा वाटा होता तो वृद्धिमान साहाच्या दमदार 115 धावांच्या शतकी खेळीचा. त्याला नमन वोराने 67 धावा करीत चांगली साथ दिली.

मात्र, पंजाबच्या या चांगल्या फलंदाजीला केकेआरनेही उत्तम फलंदाजी करीत प्रत्युत्तर दिले. केकेआरने अडखळत्या सुरुवातीनंतर मनीष पांडेच्या दमदार 94 धावांच्या खेळीच्या जोरावर सामन्यात जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर पंजाबने पुन्हा केकेआरला धक्के देत त्यांच्यावरील दबाव वाढवला. अखेर पीयूष चावलाने 5 चेंडूंत 13 धावांची छोटी; पण आक्रमक खेळी करीत किंग्ज इलेव्हन पंजाबचे आपले पहिले वहिले आयपीएल विजेतेपद मिळवण्याच्या आशा धुळीस मिळवल्या. केकेआरने दुसर्‍यांदा आयपीएलवर नाव कोरले. या हंगामात केकेआरचा फलंदाज रॉबिन उथप्पाने फलंदाजीच सातत्य दाखवत 660 धावा केल्या. तो ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी ठरला. तर, चेन्‍नई सुपर किंग्जचा गोलंदाज मोहित शर्माने 23 विकेट घेत ‘पर्पल कॅप’ पटकावली. 

Back to top button