जर रोहित कर्णधार झाला नाहीत तर भारताचा ‘लॉस’ : गंभीर | पुढारी

जर रोहित कर्णधार झाला नाहीत तर भारताचा 'लॉस' : गंभीर

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं ‘आता पांढऱ्या चेंडूवरील क्रिकेटचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्याची वेळ आल्याचं’ मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आयपीएलवर पाचव्यांदा नाव कोरले. याचबरोबर मुंबईने २०१९ आणि २०२० हे सलग दोन हंगाम आपल्या नावावर करण्याची कामगिरीही केली. 

रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या या देदिप्यमान कामगिरीनंतर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली की ‘जर आता रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार केला नाही तर हा त्यांचा लॉस असेल रोहितचा नाही. संघ जर चांगला असेल तर कर्णधारही चांगला असतो या मताचा मी आहे. पण, एका कर्णधाराच्या कामगिरीचे मोजमाप कसे केले जाते? या मोजमापाचे निकष आणि टप्पे सारखे असायला हवेत. रोहितने आपल्या संघाचे नेतृत्व करत आयपीएल पाचवेळा जिंकली आहे.’

विराट कोहली सध्या तीनही प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. याचबरोबर तो आयपीएलमध्ये आरसीबीचेही नेतृत्व करतो. विराट कोहलीला आतपर्यंत एकाही आयपीएल विजेतेपद जिंकता आलेले नाही. यंदाच्या हंगामात त्याचा संघ एलिमनेटरमध्ये पराभूत झाला होता.

दरम्यान, गौतम गंभीरने रोहित शर्माची तुलना आता भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबरोबर करायला हवी, असे मत व्यक्त केले. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, कारण त्याने भारताला आंतरराष्ट्रीय ट्रॉफीज जिंकून दिल्या आहेत आणि तीन आयपीएल ट्रॉफीही त्याच्या नावावर आहे. हाच निकष मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराबाबतही लागू व्हायला असे वक्तव्य गंभीरने केले. 

याचबरोबर गंभीरने भारतासाठी वेगवेगळे नेतृत्व शक्य असल्याचेही सांगितले. तो म्हणाला ‘त्यांनी वेगवेगळ्या नेतृत्वाचीही चाचपणी करावी. कोणीही वाईट नाही. रोहितने पांढऱ्या चेंडूवरील क्रिकेटमध्ये त्याच्या आणि विराटच्या कॅप्टन्सीमधला फरक दाखवून दिला आहे. एकजण त्याच्या संघाला पाच विजेतेपदं मिळवून देतो, तर दुसरा अजून पहिल्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेतच आहे. मी हे विराट खराब कर्णधार आहे म्हणून नाही बोलत आहे. पण, रोहित प्रमाणेच त्यालाही आरसीबीचे दीर्घकाळ नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या दोघांना एकच मापदंड असला पाहिजे. माझ्या मते नेतृत्वाच्या बाबतीत रोहित थोडा उजवा आहे.’

Back to top button