हिटमॅन रोहितच्या अनुपस्थितीचा टीम इंडियाला बसणार फटका? | पुढारी

हिटमॅन रोहितच्या अनुपस्थितीचा टीम इंडियाला बसणार फटका?

पुढारी ऑनलाईन डेस्क

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौ-याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ ३ वन डे, ३ टी २०  आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाकडे एकापेक्षा एक फलंदाज आहेत, मात्र, तरीही हिटमॅन रोहित शर्माची अनुपस्थिती संघाला जाणवेल अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केलीय. वन डे आणि टी २० फॉरमॅटमध्ये हिटमॅन रोहित हा टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर तर आहेच पण त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचं प्रदर्शन लक्ष वेधून घेणारं आहे. याच विषयी आज आपण जाणून घेऊ. 

क्रिकेटच्या दुनियेत भारताचा आक्रमक फलंदाज हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर एकपेक्षा एक विक्रम नोंदवले गेले आहेत. रोहितच्या बॅटमधून जेव्हा धावांचा पाऊस कोसळत असतो त्यावेळी त्याच्या चाहत्यांसह सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असते. मात्र, दुस-याबाजूला प्रतिस्पर्धी संघाच्या डोकेदुखीत चांगलीच वाढ झाल्याचंही आपल्याला दिसतं. 

पण रोहितचा आक्रमक अंदाज आपल्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी २० सामन्यांच्या मालिकेत दिसणार नाहीय. दुखापतीच्या कारणास्तव त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी निवड झालेली नाहीय. निवड समितीच्या या निर्णयावर अनेक दिग्गज क्रिकेटरांसह रोहितच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीय.  

चला तर एक नजर टाकूया आकडेवारीवर.. जे रोहित शर्माच्या अनुपस्थितीला अधोरेखीत करतायत. सर्वात पहिला आपण चर्चा करुया रोहित शर्माच्या ऑस्टेलियाविरुद्धच्या प्रदर्शनाची. 

रोहित शर्माने १२ जानेवारी २०१६ ला पर्थच्या मैदानावर १६३ चेंडूत १७१ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती. एका पराभूत सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कुणा भारतीय फलंजाची त्यांच्याच भूमीवरची ही एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक मोठी धावसंख्या होती. त्याचबरोबर रोहित हा एकमेव असा फलंदाज आहे ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतक फटकावले आहे. 

बंगळूर येथे २ नोव्हेंबर २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहितने १५८ चेंडूत २०९ धावांची वादळी खेळी खेळली होती. या खेळीत त्याने १६ षटकार आणि १२ चौकार लगावून १४४ धावा नुसत्या जागेवर उभा राहून वसूल केल्या होत्या. 

रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० एकदिवसीय सामने खेळले असून आतापर्यंत ४० डावांत ८ अर्धशतकं आणि ८ शतकांच्या मदतीनं त्यानं दोन हजार २०८ धावा वसूल केल्या आहेत. या एकूण खेळीत रोहितनं ७६ षटकारही ठोकले आहेत. जे सर्वाधिक आहेत. दुसरा कोणताही फलंदाज ५० षटकारही लगावू शकलेला नाहिय. 

रोहित हा एकमेव फलंदाज आहे. जो जून २०१७ पासून जानेवारी २०१९ दरम्यान खेळल्या गेलेल्या १० एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कमीत कमी एक शतक फटकावले आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक द्विशतके फटकावणा-यांच्या यादीत हिटमॅन रोहित आघाडीवर आहे. 

त्यानं श्रीलंका विरुद्ध दोन तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक द्विशक फटकावले आहे. इतर कोणताही फलंदाज दोन द्विशतकी खेळी करू शकलेला नाहीय. एवढच नाही तर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात हायस्ट स्कोर बनवणारा फलंदाज आहे. रोहितने १३ नोव्हेंबर २०१४ ला श्रीलंकेविरुद्ध १७३ चेंडूत २६४ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती. 

आता रोहितच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, विश्वचषक स्पर्धेत पाच शतकं फटकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्यानं ही कामगिरी केलीय. 

हिटमॅन रोहित सलग सात वर्षांपासून अद्वितीय प्रदर्शन करत आहे. २०१३ ते २०१९ या कॅलेंडर वर्षात रोहितची फलंदाजीतील सरासरी नेहमीच ५० च्या वर राहिली आहे. आता जर रोहितच्या टी २० क्रिकेटमधील रेकॉर्डच्या कामगिरीविषयी चर्चा करायचं झालं तर आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात ४ शतके ठोकणारा रोहित हा एकमेव फलंदाज आहे. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी २० सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियासोबत खेळताना आपल्या दिसणार नाहिय. त्याच्या सारख्या तगड्या फंलदाजाची उणीव भरून निघणं सहजासहजी शक्य नाहीय. एकूणच काय तर रोहित शर्माच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला थोडाफार फटका बसू शकतो. 

Back to top button