INDvsENG : ठाकूरचा भेदक मारा, भारताची मालिकेत बरोबरी | पुढारी

INDvsENG : ठाकूरचा भेदक मारा, भारताची मालिकेत बरोबरी

अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन 

भारताने इंग्लंड विरुद्धचा चौथा टी – २० सामना ८ धावांनी जिंकत मालिकेत २ -२ अशी बरोबरी साधत आपले आव्हान जिवंत ठेवले. भारताने ठेवलेल्या १८६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकात ८ बाद १७७ धावाच करता आल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने भेदक मारा करत ४२ धावा देत ३ विकेट घेतल्या. त्याला हार्दिक पांड्या आणि राहुल चाहरने प्रत्येकी २ विकेट घेत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने दमदार फलंदाजी करत ४६ धावांची खेळी केली. तर सलामीवीर जेसन रॉयनेही ४० धावा करत चांगली सुरुवात करुन दिली होती. पण, भारताने मोक्याच्या क्षणी विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजांना वेसन घातले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने सूर्यकुमार यादवच्या दमदार ५७ धावा आणि अय्यरच्या तडाखेबाज ३८ धावांच्या जोरावर २० षटकात ८ बाद १८५ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने दमदार गोलंदाजी करत ४ विकेट घेतल्या.

भारताने ठेवलेल्या १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात संथ झाली. भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याने टिच्चून मारा केला. अखेर या माऱ्याला तिसऱ्या षटकात यश आले आणि भुवनेश्वरने जोस बटलरचा ( ९ ) अडसर दूर केला. पण, दुसरा सलामीवीर जेसन रॉयने आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडला पॉवर प्लेमध्ये ४८ धावांपर्यंत मजल मारली. 

पण, पॉवर प्लेनंतर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या राहुल चाहरने डेव्हिड मलानला १४ धावांवर बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. दरम्यान, दुसऱ्या बाजूने इंग्लंडचा डाव सावरलेला जेसन रॉय चाळीशीमध्ये पोहचला होता. पण, पांड्याने त्याला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. रॉय बाद झाल्यानंतर इंग्लंडची धावगती मंदावली. 

रॉय बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या डावाची सर्व सुत्रे बेन स्टोक्सने आपल्या हातात घेतली. त्याने भारतीय  फिरकी गोलंदाजांवर हल्ला चढवत इंग्लंडला १३ व्या षटकात शतक पार करुन दिले. त्यानंतर बेअरस्टोनेही आक्रमक फलंदाजी करत झपाट्याने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. स्टोक्स आणि बेअरस्टोने ३६ चेंडूत ६५ धावांची भागिदारी रचली. अखेर राहुल चाहरने बेअरस्टोला २५ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर शार्दुल ठाकूरनेही बेन स्टोक्सला ४६ धावांवर बाद करत भारताला मोठा दिलासा दिला. 

शार्दुल ठाकूरने स्टोक्सला बाद करुन समाधान मानले नाही तर त्याने इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनलाही पुढच्याच चेंडूवर ४ धावांवर बाद भारताची बाजू वरचढ केली. आता इंग्लंडसमोर २२ चेंडूत ४५ धावांचे आव्हान होते. पण, भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांचा मार्ग खडतर केला. त्यातच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या सॅम करनला ( ३ ) पांड्याने बाद करुन सामन्यातील आपली दुसरी शिकार केली. 

इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी २३ धावांची गरज असताना गोलंदाजी करण्यासाठी शार्दुल ठाकूर आला होता. त्याचा सामना जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन करणार होते. आर्चरने शार्दुलच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत सामन्यात रंगत आणली. आता इंग्लंडला विजयासाठी ३ चेंडूत १२ धावांची गरज होती. शार्दुलने दोन वाईड बॉल टाकून इंग्लंडला २ धावा गिफ्ट दिल्या. पण, पुढच्याच चेेंडूवर शार्दुलने फक्त १ धाव देत स्वतःला सावरले. आता विजयसाठी २ चेंडूत ९ धावांची गरज होती. शार्दुलने पाचव्या चेंडूवर जॉर्डनला बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. अखेरच्या चेंडूवर ठाकूरने एकही धाव दिली नाही आणि भारताने सामना ८ धावांनी जिंकत मालिकेत २ -२ अशी बरोबरी साधली.  

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या षटकात धडाकेबाज सुरुवात केली. पण, त्यानंतर भारताचे बिनीचे शिलेदार एका पाठोपाठ एक बाद होत गेले. रोहित शर्मा १२ चेंडूत १२ धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव याला अपवाद ठरला. त्याने आपल्या पहिल्या वहिल्या डावाची सुरुवात षटकारानेच करत आपले इरादे स्पष्ट केले. दरम्यान, दुसऱ्या बाजूने चांगली साथ देणारा केएल राहुलही १४ धावांची भर घालून माघारी परतला. 

भारताचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीने अदिल राशीदला स्टेप आऊट होऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला पण, त्याचा हा प्रयत्न फसला. तो अवघ्या १ धावेवर बाद झाला. दुसऱ्या बाजूने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने भारताला १० षटकात ७५ धावांपर्यंत पोहचवले. त्याने २८ चेंडूत अर्धशतक ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी पाया तयार केला. त्याने ऋषभ पंतच्या साथीने १३ व्या षटकात भारताचे शतक धावफलकावर लावले. पण, सूर्यकुमारची ही धडाकेबाज इनिंग ३० चेडूंच ५७ धावा केल्यानंतर संपुष्टात आली. त्याने आपल्या या ५७ धावांच्या खेळीत ३ षटकार आणि ६ चौकार मारले. 

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर पंत आणि श्रेयस अय्यरने धावांची गती कायम राखत ३४ धावांची भागिदारी रचली. पण, जोफ्रा आर्चरने २३ चेंडूत ३० धावा करणाऱ्या पंतचा त्रिफळा उडवला. पंत बाद झाल्यानंतर अय्यरने आक्रमक फलंदाजी करत भारताला १९ व्या षटकात १७० धावांपर्यंत पोहचवले. पण,  १८ चेंडूत ३७ धावा करुन तो अखेरच्या षटकात बाद झाला. तो बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरही बाद झाला. पण, शार्दुल ठाकूरने ४ चेंडूत १० धावा ठोकत भारताला १८५ धावांपर्यंत पोहचवले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ३३ धावात ४ विकेट घेत दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले.

Back to top button