RCB vs CSK : बेंगलोरचा ‘रॉयल’ विजय चेन्नईवर 13 धावांनी मात | पुढारी

RCB vs CSK : बेंगलोरचा ‘रॉयल’ विजय चेन्नईवर 13 धावांनी मात

पुणे ; वृत्तसंस्था : महिपाल रोमरोर (42), फाफ डू प्लेसिस (38), कोहली (30) यांच्या उपयुक्त फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्‍याच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने चेन्नई सुपर किंग्जवर (RCB vs CSK) 13 धावांनी विजय मिळविला. याबरोबरच आरसीबीने आयपीएल -2022 च्या गुणतक्त्यात 12 गुणांसह चौथ्या स्थानी झेप घेतली. सातवा पराभव पत्करणार्‍या चेन्नईच्या डेवॉन कॉन्वे (56) याचे अर्धशतक व्यर्थ ठरले.

विजयासाठी 174 धावांचे टार्गेट नजरेसमोर ठेवून उतरलेल्या चेन्नईने 20 षटकांत 8 बाद 160 धावा काढल्या. चेन्नईच्या डेवॉन कॉन्वे व ऋतुराज गायकवाड यांनी सहाव्या षटकात संघाचे अर्धशतक फलकावर लावले. शहबाज अहमदने गायकवाडला (28) झेलबाद करून सलामी जोडी फोडली. चेन्नईला 54 वर पहिला धक्का बसला. तर अनुभवी उथाप्पाचा (1) अडसर मॅक्सवेलने दूर केला. यामुळे चेन्नईची 2 बाद 59 अशी स्थिती झाली. अंबाती रायडूही फार काळ टिकला नाही, तो 10 धावांवर परतला.

13 व्या षटकात चेन्नईचे शतक पूर्ण झाले. दरम्यान, सलामीवीर कॉन्वेने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने 33 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह हे अर्धशतक पूर्ण केले. कॉन्वेला 56 धावांवर हसरंगाने शहबाजकरवी झेलबाद केले. शेवटच्या पाच षटकात चेन्नईला 56 धावांची गरज होती. मात्र, याचवेळी जडेजा (2) पटेलच्या गोलंदाजीवर विराटकडे झेल देऊन परतला.

शेवटच्या 18 चेंडूंत 47 धावांची गरज असताना मोईन अली 2 चौकार व 2 षटकारांसह 34 धावा काढून बाद झाला. पाठोपाठ हेजलवूडने धोनीला (2) पाटीदारकडे झेल देण्यास भाग पाडले. यामुळे चेन्नईची 7 बाद 135 अशी स्थिती झाली. शेवटच्या षटकात प्रेटोरियस (13) बाद झाला. शेवटी चेन्नईने 8 बाद 160 धावा काढल्या. सिमरजीत 2 तर तीक्षणा 7 धावांवर नाबाद राहिले. बेंगलोरच्या हर्षल पटेलने 35 धावांत 3 विकेटस् घेतल्या. (RCB vs CSK)

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना बंगलोरने 20 षटकांत 8 बाद 173 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि कोहली यांनी डावास सुरुवात केली. सूर गवसलेल्या कोहलीला सोबत घेत प्लेसिसने पाचव्या षटकातच संघाचे अर्धशतक फलकावर लावले.

जम बसलेली ही जोडी फोडताना मोईन अलीने प्लेसिसला जडेजाकडे झेल देण्यास भाग पाडले. प्लेसिसने (38) कोहलीसोबत 68 धावांची सलामी दिली. प्लेसिस परतल्यानंतर मॅक्सवेलने पुन्हा एकदा निराशा केली. त्याला अवघ्या 3 धावांवर धोनीने उथाप्पाच्या थ्रोवर धावबाद केले. तर मोईननेच कोहलीला (30) त्रिफळाबाद करत बेंगलोरची स्थिती 3 बाद 79 अशी केली.

त्यानंतर रजत पाटीदार व महिपाल रोमरोर यांनी संघाला सावरताना 14 व्या षटकात बेंगलोरचे शतक पूर्ण केले. मात्र, पाटीदार 15 चेंडूंत 21 धावा काढून परतला. तर लोमरोरने एका बाजूने आक्रमक फटकेबाजी करताना 27 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 42 धावांचे योगदान दिले. 19 व्या षटकात प्रथम लोमरोर त्यानंतर हसरंगा (0), शाहबाज अहमद (1) या तिघांना तीक्ष्णाने पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. तर शेवटच्या षटकात हर्षल पटेल (0) धावबाद झाला. शेवटी फॉर्ममध्ये असलेला दिनेश कार्तिक 17 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकारांसह 26 धावांवर आणि मोहम्मद सिराज शून्यावर नाबाद राहिले. चेन्नईच्या वतीने तीक्ष्णाने 27 धावांत 3 तर मोईन अलीने 2 विकेटस् घेतल्या.

मोईन अलीचे बळींचे दीडशतक (RCB vs CSK)

बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसची विकेट घेत मोईन अलीने टी -20 प्रारूपात 150 बळींचा टप्पा पार केला. या प्रारूपात विकेटचे दीडशेत पूर्ण करणारा मोईन आता जगातील 123 गोलंदाज बनला आहे. त्याने या सामन्यात 28 धावांत 2 विकेटस् घेतल्या.

Back to top button