RCBvsDC : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्सला 16 धावांनी नमवले | पुढारी

RCBvsDC : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्सला 16 धावांनी नमवले

मुंबई ; वृत्तसंस्था : धारदार गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्सला (RCBvsDC) 16 धावांनी नमवून आकर्षक विजयाची नोंद केली. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीचे सहा सामन्यांतून 8 गुण झाले आहेत. दिल्लीचे पाच सामन्यांतून 4 गुण झाले आहेत. दोन विजय आणि तीन पराभव ही त्यांची कामगिरी होय. 20 षटकांत दिल्लीला 7 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिनेश कार्तिक 5 धावांवर असताना कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कर्णधार ऋषभ पंतने झेल सोडला आणि नंतर याच कार्तिकने दिल्लीच्या गोलंदाजीची निर्दयी कत्तल केली. तिथेच दिल्लीच्या पराभवाची बीजे रोवली गेली.

विजयासाठी 190 धावांचे आव्हान समोर ठेवून मैदानात उतरलेल्या दिल्ली संघाकडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 50 धावांची सलामी दिली. तथापि, वैयक्तिक 16 धावांवर पृथ्वी बाद झाला. महम्मद सिराजने त्याला अनुज रावतकरवी झेलबाद केले. नंतर मिशेल मार्शने रटाळ फलंदाजी केली. त्यामुळे आवश्यक असलेली धावगती फुगत गेली आणि विजय दिल्लीच्या हातून निसटत गेला. 14 धावांसाठी 24 चेंडू घेतलेला मार्श धावबाद झाला आणि पाठोपाठ रोवमन पॉवेल पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता तंबूत परतला. आवश्यक धावगती तेव्हा 14 च्या आसपास पोहोचली होती. (RCBvsDC)

दिल्लीची देहबोलीच पराभूत मानसिकता दर्शवत होती. 15 षटके झाली तेव्हा दिल्लीची अवस्था 5 बाद 115 अशी दयनीय झाली. ललित यादवला जोश हेझलवूडने बाद केले. ऋषभ पंतने 34 धावांची खेळी करून सामन्यात थोडाफार रंग भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला महम्मद सिराजने तंबूत पाठवून दिले. विराट कोहलीने एका हाताने घेतलेला हा झेल अफलातून होता. आरसीबीकडून जोश हेझलवूडने 3, तर महम्मद सिराजने 2 गडी टिपले. वानिंदू हसरंगाने एक बळी मिळवला.

त्यापूर्वी, आरसीबीने 20 षटकांत 5 बाद 189 धावा झोडल्या. त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. अडखळत खेळणारा कर्णधार फाफ डू प्लेसिस याला खलील अहमदने 8 धावांवर तंबूत पाठवले. दुसरा सलामीवीर अनुज रावत याला शार्दूल ठाकूरने शून्यावरच पायचीत पकडले. विराट कोहली फार काळ टिकू शकला नाही. 12 धावांवर तो धावचीत झाला. आरसीबीच्या डावाला आकार दिला तो ग्लेन मॅक्सवेलने. 34 चेंडूंत त्याने 55 धावांची तडाखेबंद खेळी करताना 7 चौकार व 2 षटकार ठोकले. गोव्याचा सुयश प्रभुदेसाई फक्त 6 धावा करू शकला. 13 षटकांचा खेळ झाला तेव्हा फलकावर 100 धावा लागल्या होत्या. (RCBvsDC)

दिनेश कार्तिकनेे नाबाद 66 धावांची वादळी खेळी केली. त्याने 18 व्या षटकात मुस्तफिजुरच्या गोलंदाजीवर 24 धावा वसूल केल्या. दोन षटकार आणि चार चौकारांची बरसात करून त्याने उपस्थित रसिकांना खूश केले. केवळ 26 चेंडूंत कार्तिकने अर्धशतकी मजल मारली. कार्तिक आणि शाहबाज अहमद या जोडीने दिल्लीच्या गोलंदाजीची पिसे काढली.

कार्तिकने 66 चेंडूंचा सामना करून 5 चौकार व तेवढेच षटकार खेचले. शाहबाजने 21 चेंडूंत 32 धावा झोडल्या त्या 3 चौकार व एका षटकारासह. या दोघांमुळेच आरसीबीला 20 षटकांत 5 बाद 189 अशी समाधानकारक धावसंख्या रचता आली. दिल्लीकडून शार्दूल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. मुस्तफिजुर रहमानच्या चार षटकांत 48 धावा कुटण्यात आल्या. तो सर्वात महागडा ठरला.

सामन्याला मिळाली कलाटणी… 

दिनेश कार्तिक 5 धावांवर असताना कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कर्णधार ऋषभ पंतने झेल सोडला आणि नंतर याच कार्तिकने दिल्लीच्या गोलंदाजीची निर्दयी कत्तल केली. तिथेच दिल्लीच्या पराभवाची बीजे रोवली गेली. हा झेल जर पंतने घेतला असता तर सामन्याचे चित्र काही वेगळेच दिसले असते. खेरीज दिल्लीच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून या सामन्यात कचखाऊ फलंदाजी केली.

Back to top button