हैदराबादनं गुजरातच्या घोडदौडीला घातला लगाम | पुढारी

हैदराबादनं गुजरातच्या घोडदौडीला घातला लगाम

नवी मुंबई : वृत्तसंस्था

केन विलियम्सन याने केलेल्या अप्रतिम फलंदाजीच्या बळावर हैदराबादने गुजरातच्या घोडदौडीला लगाम घातला आहे. सोमवारच्या लढतीत हैदराबादने गुजरातला 8 गडी राखून दणका दिला. विजयासाठी ठेवलेले 163 धावांचे लक्ष्य त्यांनी 19.1 षटकांतच पार केले. त्यांनी 168 धावा केल्या. त्यामुळे चार सामन्यांतून हैदराबादचे चार गुण झाले असून यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातला प्रथमच पराभवाचा धक्का बसला आहे. विजयाची हॅट्ट्रिक नोंदवलेल्या गुजरातचे चार सामन्यांतून सहा गुण झाले आहेत. या आधीच्या सामन्यात हैदराबादने चेन्नईला आठ गड्यांनी दणका दिला होता.

अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विलियम्सन यांनी हैदराबादच्या डावाला सावध सुरुवात केली. या दोघांनी 64 धावांची खणखणीत सलामी दिली. त्यात अभिषेकचा वाटा होता 42 धावांचा. 32 चेंडूंचा सामना करताना त्याने अर्धा डझन चौकार ठोकले. 10 षटकांचा खेळ संपला तेव्हा हैदराबादने 75 धावा केल्या होत्या. आता त्यांना 60 चेंडूंत विजयासाठी 88 धावा हव्या होत्या. आता आवश्यक धावगती नऊच्या आसपास पोहोचली होती.

तेराव्या षटकात हार्दिक पंड्याला विलियम्सनने लागोपाठ दोनदा सीमारेषेबाहेर भिरकावून दिले. 13.1 षटकांचा खेळ झाला तेव्हा हैदराबादची धावसंख्या होती 1 बाद 104. दरम्यान मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे राहुल त्रिपाठी याला मैदान सोडावे लागले. त्यापूर्वी त्याने 11 चेंडूंत 17 धावा चोपल्या त्यात एक चौकार आणि एका षटकारासह. त्यानंतर केन विलियम्सन मोक्याच्या क्षणी बाद झाला. हार्दिक पंड्याने त्याला टिपले. केनने 46 चेंडूंत 57 धावा करताना दोन चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर षटकारांची बरसात करून पूरन (34) आणि एडन मार्करम (12) यांनी हैदराबादचा विजय साकारला.

त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना गुजरातने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 162 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्याचे नाबाद अर्धशतक आणि अभिनव मनोहरच्या 35 धावा यामुळेच गुजरातच्या धावसंख्येला आकार आला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे त्यांचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. गिलने 7 तर सुदर्शनने 11 धावा केल्या. गिलला भुवनेश्वर कुमारने तर सुदर्शनला टी. नटराजनने तंबूचा रस्ता दाखवला. तसेच उमरान मलिक याने सलामीवीर मॅथ्यू वेड याला टिपले. वेडने 19 चेंडूंत 19 धावा करताना दोनदा चेंडू सीमापार पाठवला.

कर्णधार हार्दिक पंड्याने मैदानात उतरताच टोलेबाजीला सुरुवात केली. डेव्हिड मिलर यावेळी त्याला साथ देत होता. 10 षटकांत गुजरातने 80 धावा केल्या होत्या. 24, 47 आणि 63 धावा झालेल्या असताना गुजरातचे अनुक्रमे पहिले तीन फलंदाज बाद झाले. मिलरने दुय्यम भूमिका स्वीकारून पंड्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचे धोरण अवलंबले होते. 12.4 षटकांत गुजरातने 100 धावांचा टप्पा गाठला. दरम्यान, मिलरला मार्को जेन्सनने 12 धावांवर अभिषेक शर्माच्या हाती झेल द्यायला लावला. त्यानंतर अभिनव मनोहर मैदानात उतरला. त्याने 21 चेंडूंत 35 धावांची घणाघाती खेळी करताना 5 चौकार व 1 षटकार हाणला. पंड्याने 42 चेंडूंत नाबाद 50 धावा केल्या. 4 चौकार व एक षटकार हे त्याचे मुख्य फटके. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी दोन तर मार्को जेन्सन आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक गडी टिपला.

Back to top button