बँक लॉजिस्टिक क्षेत्राचा अविश्वसनीय विस्तार | पुढारी

बँक लॉजिस्टिक क्षेत्राचा अविश्वसनीय विस्तार

नाशिक : राजू पाटील

मंदी आणि तेजीच्या चक्रात काही कंपन्या उसळी घेतात, तर काही काठाच्या दिशेने ढकलल्या जातात. परंतु याला अपवाद ठरले आहे ते सेवा क्षेत्र. मुळात भारताची अवाढव्य लोकसंख्या, भौगोलिक विविधता, मध्यमवर्गीयांची वाढती संख्या, डिजिटलायझेशनच्या दिशेने देशाची मुसंडी आणि दोन दिवसांपूर्वी मोदींनी अमेरिका दौऱ्यात आयटी क्षेत्रातील कंपन्यांबरोबर केलेले करार यामुळे भारतातील सेवा क्षेत्राला अक्षरश: सोनेरी दिवस आलेले आहेत.

जागतिक मंदीतही भारतीय सेवा क्षेत्र हे झपाट्याने विस्तारले आहे अन विस्तारत आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग व वित्तपुरवठा याबाबत सातत्याने घडामोडी घडत असून, त्यातून गुंतवणुकीचे नानाविध पर्याय समोर येत आहेत. बँकिंग हे क्षेत्र भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आगामी १० वर्षांत रोजगारनिर्मितीत बांधकाम क्षेत्राशीही हे क्षेत्र बरोबरी करू शकते, इतके बदल त्यात होताना दिसत आहे. बँकिंग आणि आयटी यांचा मिलाफ होत चालल्याने अनेक सेवांमध्ये ऑटोमेशनचा वेग प्रचंड वेगाने वाढला आहे. एटीएम, बँक खात्यांची हाता‌ळणी, बँकिंग सायबर सिक्युरिटी, बँक लॉजिस्टिक, नेटवर्किंग आदी क्षेत्रात भारतात गेल्या १० वर्षांत अनेक दिग्गज कंपन्या उदयास आल्या आहेत आणि गुंतवणुकीची खरी संधी त्यातच आहे.

सीएमएस इन्फोची उत्तुंग झेप

बँकिंग लॉजिस्टिक आणि तंत्रज्ञान सेवेतील आघाडीची कंपनी सीएमएस इन्फो सिस्टिम्स लिमिटेड (सीएमएस) ने नुकतीच एक उत्तुंग झेप घेतली. सीएमएसने पंजाब नॅशनल बँकेसाठी (पीएनबी) २६ राज्यांमधील ५२६ शहरे आणि गावांमध्ये ५,२०० पेक्षा अधिक एटीएम केंद्रांच्या व्यवस्थापित सेवांची नुकतीच अंमलबजावणी पूर्ण केली आहे. या सेवांच्या पूर्ततेमुळे पीएनबी बँकेसाठी सर्वांत मोठी एटीएम व्यवस्थापित सेवा प्रदान करणारी कंपनी बनण्याचा मान सीएमएसला मिळाला आहे.

देशातील विविध एटीएमच्या रोखतेचे व्यवस्थापन करणे, रोख नोटांच्या गरजेचा आगाऊ अंदाज व्यक्त करणे त्याचबरोबर वेळेत विविध केंद्रांवर रोखतेची उच्च उपलब्धता सुनिश्चित करणे यासारख्या सुविधांत सीएमएस अव्वल आहे. पीएनबी बँकेसाठी तयार केलेल्या एटीएम नेटवर्कमध्ये स्टार्ट टू एंड सेवा समाविष्ट आहेत. केंद्रिकृत देखरेखींचा हा उत्तम नमुना असून, त्यामुळे सीएमएसला इन्फोला पीएनबीमुळे कित्येक वर्षासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे. सीएमएसद्वारे बँकिंग ऑटोमेशन, एटीएम सेवा आणि तंत्रज्ञान आधारित पर्याय, एटीएम केंद्राच्या ठिकाणी तांत्रिक सुविधांची उभारणी आदी सेवा पुरविल्या जातात.

बँका, ग्राहक, व्यापारी आणि व्यवसाय यांना एकत्रित जोडणाऱ्या सीएमएस इन्फो कॅश लॉजिस्टिक, एटीएम सॉफ्टवेअर सोल्युशन्स आणि एआयओटी रिमोट मॉनिटरिंगमध्ये भारतातील अव्वल कंपनी असून, भारतातील ९७ टक्के जिल्ह्यात या कंपनीची सेवा सुरू आहे. गत आथिक ‌‌वर्षात २९७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविणाऱ्या या कंपनीला विस्तारासाठी प्रचंड संधी आहेत. गेल्या वर्षभर २०० ते २७५ रुपयांदरम्यान असलेल्या या समभागाने तीनशेचा टप्पा ओलांडला असून, मोठ्या उसळीसाठी तो सज्ज झालेला आहे. टप्पाटप्प्यात तो खरेदी करत पोर्टफोलिओ तयार करण्याची नामी संधी त्याने दिलेली आहे.

बँक लॉजिस्टिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांचा आताच विचार करणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील टीमलिज, एसआयएस या कंपन्यांनीही जोरदार कामगिरी केलेली आहे. त्यांची कामगिरी पाहिल्यास सीएमएस इन्फो सध्याच्या मूल्यपातळीवर खरेदीची संधी देत आहे.

बजाज फिनसर्व्ह संधी

सेवा क्षेत्रातील आणखी एक दिग्गज कंपनी म्हणजे बजाज फिनसर्व्ह. बजाज फिनसर्व्ह लिमिटेडने पुण्यातील पाच हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केला आहे. बजाज फिनसर्व्ह कॅम्पस हा पुण्यातील एक प्रतिष्ठित प्रकल्प आहे आणि त्यात जागतिक दर्जाची कार्यक्षेत्रे उभी राहणार आहेत. या प्रकल्पामुळे तब्बल 40 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या प्रकल्पामुळे जागतिक स्तरावरील भागीदार, विक्रेते, पुरवठादार आणि कंत्राटदारांसाठी नवीन रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. बजाज फिनसर्व्ह ग्रुप भारतभरातील 4,500 पेक्षा जास्त ठिकाणांद्वारे १० कोटी ग्राहकांना सेवा देत आहे. राहुल बजाज यांनी 16 वर्षांपूर्वी स्थापन केलेली बजाज फिनसर्व्ह कंपनीने वित्तीय सेवा उद्योगात कंपनीने ग्राहक कर्ज, डिजिटल कर्ज देण्याच्या नावीन्यपूर्णतेद्वारे विशेष योगदान दिले आहे. बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी ईएसजी दृष्टिकोनातून हा प्रकल्प एक शाश्वत विकास म्हणून आखलेला आहे.

होल्डिंग कंपनी क्षेत्रातील बजाज फिनसर्व्हचे आगामी सणासुदीच्या काळात उत्तुंग कामगिरीचे अहवाल अनेक ब्रोकिंग फर्मने जारी केलेले आहेत. कंपनीच्या समभागाने पुन्हा १,५०० रुपयांचा टप्पा वर्षभरात दुसऱ्यांदा ओलांडला असून, आगामी तीन महिन्यांत या समभागासाठी १,८०० रुपयांचे भाकित ब्रोकिंग फर्मने केेलेले आहे. पोर्टफोलिओ उभारणीसाठी हा समभाग उत्तम आहे.

बीएसई डेरिव्हेटिव्हच्या उलाढालीचा सहा लाख कोटींचा टप्पा पार
एस ॲण्ड पी बीएसई सेन्सेक्स डेरिव्हेटिव्हने एक्सचेंजमध्ये एका दिवसात सर्वाधिक उलाढाल करत ६,०६,६३७ कोटी रुपये (पर्यायांमध्ये ६,०६,५७६ कोटी रुपये आणि फ्युचर्समध्ये ६१ कोटी रुपये) उच्चांक गाठला. या आठवड्यातील उलाढाल ही मागील आठवड्याच्या ३,४२,१२९ कोटी रुपयांच्या एक्सपायरी उलाढालीपेक्षा 77 टक्के वाढली आहे. एकूण ९६.११ लाख करारांचे व्यवहार झाले. एकूण खुल्या व्याजाने कालबाह्य होण्यापूर्वी ४.९३ लाख करारांचे शिखर गाठले.

Back to top button