धक्कादायक! पार्क केलेली कार अचानक विहिरीत बुडाली | पुढारी

धक्कादायक! पार्क केलेली कार अचानक विहिरीत बुडाली

घाटकोपर; पुढारी वृत्तसेवा : घाटकोपर पश्चिम येथील कराणी लेन जवळ असलेल्या राम निवास समोर एक मोटार कार स्लॅब तुटून थेट त्या खालील विहिरीत कोसळली. ही घटना रविवार (दि. १३) सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली. डॉ. किरण दोषी यांची ही मोटार कार आहे. 

वाचा : …तर पश्चिम महाराष्ट्रात कडक निर्बंध: मंत्री वडेट्टीवार

या विहिरीच्या अर्ध्या भागावर आरसीसी बांधकाम करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या आरसीसी बांधकाम केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी मोटारकार पार्क करीत असत. हाच आरसीसीचा भाग खचून त्यावर पार्क केलेली डॉ. दोषी यांची कार पाण्यात बुडाली. या कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. मात्र ही गाडी काही सेकंद अगोदरच महादेव शिगवण हे धुवून दुसरी गाडी धुण्यासाठी म्हणून बाजूला गेले आणि अचानक आवाज आला आणि थेट गाडी या विहिरीत बुडू लागली. 

शिगवण यांनी जोरात आवाज देऊन कारचे मालक डॉ. दोषी यांना बोलावले. डॉक्टर दोषी यांनी या घटनेचा व्हिडिओ स्वतः च्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. जो काही वेळातच समाज माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिस, पालिका आपत्कालीन विभाग चे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. महापालिकाद्वारे पाणी उपसण्याच्या काम उशिरा पर्यंत सुरू होते. 

राम निवासमधील ही विहीर सुमारे ९० वर्ष जुनी असल्याचे स्थानिक सांगत आहेत. साधारणतः चाळीस फूट खोल इतकी ही विहीर आहे. त्यावर चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी हा स्लॅब टाकला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर अशा अनेक विहिरी या विभागात असल्याचे देखील स्थानिक सांगत आहेत. सध्या या विहिरी मधील पाणी उपसण्याचे आणि क्रेन च्या सहाय्याने ही मोटार कार बाहेर काढण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.

वाचा : बाबा का ढाबा : ‘तो ब्लॉगर चोर नव्हता’

वाचा : ‘प्रशांत किशोरच्या लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी’  

Back to top button