म्युकर रुग्णांच्या संख्येत पुणे दुस-यास्थानी | पुढारी

म्युकर रुग्णांच्या संख्येत पुणे दुस-यास्थानी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात म्युकर मायकोसिसचे सर्वाधिक 1307 रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. दुसर्‍या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. येथे आतापर्यंत 1217 रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून  8 हजार 184 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 2 हजार 884 रुग्ण बरे झाले आहेत. 734 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 22 जूनपर्यंत  पहिल्या क्रमांकावर नागपूर, दुसरे पुणे, तिसरे औरंगाबाद, चौथे मुंबई आणि पाचव्या क्रमांकावर नाशिक जिल्हा आहे. नागपूरमध्ये 1 हजार 307, पुण्यात 1 हजार 217, औरंगाबादमध्ये 945, मुंबई आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 529 रुग्ण आढळून आलेले आहेत. रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत प्रत्येकी 11, वाशिम, भंडारा व हिंगोली जिल्ह्यांत प्रत्येकी 16 रुग्ण आहेत.

मृत्यू दर 9.33 टक्क्यांवर

म्युकर मायकोसिसचा मृत्यू दर 40 टक्क्यांच्या पुढे असतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे; मात्र रुग्णांचे तातडीने निदान झाल्याने आणि उपचार मिळाल्याने त्यांचा मृत्यू दर 10 टक्क्यांच्या आत राहण्यास मदत झाली आहे. राज्यात 8 हजार 184 रुग्णांपैकी 734 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नागपूर सर्वाधिक 104, पुणे 93, औरंगाबाद 80, मुंबई 50, नाशिक 53 आणि सोलापूर 52 अशी संख्या आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मृतांची संख्या चाळीसच्या आत आहे. 

53 टक्के रुग्णांवर उपचार सुरू

राज्यातील 8 हजार 184 रुग्णांपैकी 4 हजार 407 म्हणजेच 53 टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नागपुरातील 566, पुणे 882, औरंगाबाद 395, मुंबई 420, नाशिक 242, सोलापूर 154 व इतर सर्व जिल्ह्यांमध्ये दीडशेपेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

 

Back to top button