मिरज : रुग्णालयातून पलायन केलेल्या कोरोनाबाधित दरोडेखोरास अटक | पुढारी

मिरज : रुग्णालयातून पलायन केलेल्या कोरोनाबाधित दरोडेखोरास अटक

मिरज; पुढारी वृत्तसेवा : येथील मिरज कोरोना रुग्णालयातून पलायन केलेला दरोड्यातील संशयित आनंदा रामा काळे (वय 30, रा. मल्लेवाडी, ता. मिरज) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून टाकळी येथून अटक केली.

वाचा :‘चिकन खाल्याशिवाय कोरोना सेंटर सोडणारच नाही’

मिरज-पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा येथे गेल्या महिन्यात धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी काळे याला अटक केली होती. सध्या तो सांगली येथील कारागृहात होता. परंतु कारागृहात तो कोरोनाबाधित झाल्याने त्याला उपचारासाठी मिरज कोरोना रुग्णालयात दाखल केले होते. दि. 7 जुलै रोजी काळे हा मध्यरात्री रुग्णालयातून पसार झाला होता.

काळे हा कोरोना बाधित आणि तो दरोड्यातील संशयित असल्याने मिरज ग्रामीण पोलिस ठण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक समाधान बिले, प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक केशव रणदिवे, पोलिस हवालदार प्रविण वाघमोडे, प्रविण तेली, अशफाक शेख, नयना पाटील यांचे पथक त्याचा शोध घेत होते.

दरम्यान प्रविण वाघमोडे व अशफक शेख हे मिरज पूर्व भागात त्याचा शोध घेत असताना काळे हा टाकळी येथील पारधी वस्तीवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने टाकळी आडवा रस्ता येथे सापळा रचून त्याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे मिरज ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

वाचा :दुकाने सुरू करताच महापालिका, पोलिसांकडून कारवाईचा दणका

वाचा :राज्यातील ‘या’ ५ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

Back to top button