सुशांत सिंहच्या मृत्यूची होणार सीबीआय चौकशी   | पुढारी

सुशांत सिंहच्या मृत्यूची होणार सीबीआय चौकशी  

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस बिहार सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. ही शिफारस स्वीकारण्यात आली असल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली.  सुशांत सिंहच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून बिहार आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने आलेले आहे. त्यातच या प्रकरणात आता सीबीआयची एंट्री होणार आहे. 

सुशांत सिंहच्या मृत्यूमागचे रहस्य बाहेर येण्याची गरज असल्याची टिपणी न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय यांनी सुनावणीदरम्यान केली. बिहार सरकारने सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती, ही शिफारस स्वीकारण्यात आली असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारतर्फे सांगितले. 

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सुशांत सिंहला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केलेला आहे. यासंदर्भात त्यांनी पाटणा येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाटणा येथे असलेला गुन्हा मुंबईत वर्ग केला जावा, अशी विनंती रियाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. बांद्रा येथील राहत्या घरी सुशांत सिंह गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत 14 जून रोजी आढळला होता.

पोलिस अधिकार्‍याला क्‍वारंटाईन करणे अयोग्य 

सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या बिहारच्या पोलिस अधिकार्‍याला क्‍वारंटाईन करण्यात आल्याच्या प्रकारावर न्यायालयाने  तीव्र नाराजी व्यक्‍त केली. अशाप्रकारच्या कृतीमुळे देशासमोर चुकीचा संदेश जात असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. यावर महाराष्ट्र सरकारच्या वकिलांकडून युक्‍तिवाद करण्यात आला की, सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीचा विषय बिहार पोलिसांच्या कार्यकक्षेत येत नाही. इतकेच नव्हे, तर त्यांना तेथे एफआयआर दाखल करता येत नाही. 

तरीही त्यांनी तो दाखल करून घेतला. चौकशीसाठी त्यांचे अधिकारीही मुंबईत आले. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे, सुशांतच्या वडिलांनी महाराष्ट्र पोलिस या प्रकरणातील पुरावे मिटविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. 

Back to top button