दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन | पुढारी

दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

हैदराबाद : पुढारी ऑनलाईन 

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील दर्जेदार चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे आज (दि. १७) हैदराबाद येथे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरु होते. रितेश देशमुखची मराठी डेब्यू फिल्म लय भारी चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. तत्पूर्वी, त्यांचे निधन झाल्याची बातमी माध्यमांमध्ये पसरली. त्यानुमार बातम्याही पसरल्या. अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करून त्यांच्या निधनाबाबत खुलासा केला. तथापि सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

त्यांनी मराठीतील डोबिवली फास्ट आणि हिंदीतील दृष्यम, मदारी सारखे अनेक दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांना मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. तसेच बेस्ट फिल्म क्रिटिक श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यांचा जन्म १७ जून १९७० ला मुंबईतील दादर येथे झाला. दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनयही केला होता. 

त्यांनी डोंबिवली फास्ट या चित्रपटामार्फत दिग्दर्शनात पदार्पण केले. हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतील त्या वर्षीचा सर्वात मोठी हिट चित्रपट ठरला होता. याचबरोबर त्यांनी ‘सातच्या आत घरात’ या प्रसिद्ध मराठी चित्रपटाचे लेखन आणि अभिनयही केला. त्यांनी इरफान खानला घेऊन मदारी हा दर्जेदार चित्रपटही दिला. मराठी हिंदी पाठोपाठ त्यांनी तमिळ चित्रपट सृष्टीतही अनेक चित्रपट दिग्दर्शन केले. 

त्यांनी हिंदी, मराठी आणि तामिळ चित्रपट सृष्टीत मिळून ८ चित्रपट दिग्दर्शीत केले आहेत. याच बरोबर ५ चित्रपटात अभिनयही केला आहे. त्यांनी डोेबिवली फास्ट, लय भारी या चित्रपटांचे दिग्दर्शन आणि सातच्या आत घरातचे लेखन, अभिनय आणि फुगे चित्रपटात अभिनय केला आहे. तसेच मुंबई मेरी जान, फोर्स, दृष्यम, मदारी, रॉकी हँडसम या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी इव्हाने ओरवान या तामिळ चित्ररटाचेही दिग्दर्शन केले आहे.

Back to top button