जान्हवी म्हणते, आईची नव्हती इच्छा मी अभिनेत्री… | पुढारी

जान्हवी म्हणते, आईची नव्हती इच्छा मी अभिनेत्री...

पुढारी ऑनलाईन

श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षापासून चेहर्‍याला रंग लावून कॅमेर्‍यासमोर अभिनय करण्यास सुरुवात केली होती. आधी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन तिने अभिनयाच्या क्षेत्रावर अक्षरशः राज्य केले. मात्र, या क्षेत्रातील सर्व भलेबुरे अनुभव तिने घेतलेले असल्याने आपल्या लाडक्या लेकीने चित्रपटसृष्टीत येऊ नये, असेच तिला वाटत असे. तिने एका मुलाखतीत मुलीला अभिनेत्री बनवण्याऐवजी तिला डॉक्टर बनवण्याची इच्छा असल्याचेही म्हटले होते.

चांगला मुलगा पाहून तिचे लग्‍न लावून देणेही आवडेल, असेही तिने म्हटले होते; मात्र नियतीची इच्छा वेगळीच असते. जान्हवीने अभिनय करण्याचे ठरवल्यावर तिने ही बाब आपल्या आईलाच आधी सांगितली. जान्हवीने एका मुलाखतीत म्हटले आहे, माझी आई प्रोटेक्टिव्ह होती आणि आमच्या काळजीपोटी तिचा पाराही बर्‍याचवेळा चढत असे. मी कुणावरही पटकन विश्वास ठेवते आणि वाहवत जाते असे तिला वाटत असे. आईला मी अभिनय करणार असे सांगितल्यावर ती नाराज झाली. तिने ही बाब वडिलांना सांगितली.

मी खूप नाजूक आणि भोळी आहे, असे दोघांचेही म्हणणे होते. त्यामुळेच मी या क्षेत्रात येऊ नये, असे त्यांना वाटे; पण माझी अभिनयाची आवड पाहून लवकरच दोघांचा विरोध मावळला. एक चांगली अभिनेत्री बनण्यासाठी एक चांगली व्यक्‍ती बनणे गरजेचे आहे, असा सल्‍ला आईने दिला होता, असेही जान्हवीने सांगितले.

Back to top button