लवंगी मिरची : विकासाच्या वाटा | पुढारी

लवंगी मिरची : विकासाच्या वाटा

कुठे आहात हो देशपांडे?
आलोच पाच मिनिटांत जोशी.
एवढा वेळ का लागतोय तुम्हाला? स्टेशनपासून जवळ आहे माझं घर… रस्ता चुकलात की काय? स्टेशनच्या बाहेर पडल्यापडल्या नरवीर तानाजी रस्ता धरायला सांगितलं होतं मी.
पण, मला तशी पाटी दिसलीच नाही.

मोठ्ठी पाटी आहे तिथे डावीकडे.
पाटी होती; पण तिच्यावर ‘सबका साथ, सबका विकास’ असं लिहिलं होतं.
तो बॅनर असेल. सध्या सगळीकडे बॅनरांचंच साम्राज्य आहे. बरं, तुमच्या डावीकडे एक केशकर्तनालय आहे का?
नाय बा. डावीकडे वाकडी काठी आहे.
मग काढा की ती!

काढणार कशी? मोठ्या होर्डिंगवर आहे ती. खाली स्लोगनही दिलीये, ‘देशाच्या भल्यासाठी, प्रत्येक हातात वाकडी काठी’.
सोबत मोठ्ठं काठीचं चित्र. असंय का?
होर्डिंगमागं केशकर्तनालय लपलेलं दिसतंय. राहू द्या. तुमच्या उजवीकडे काय आहे?
उजवीकडे बैलगाडी आहे.
एवढ्या गर्दीत बैलगाडी?
म्हणजे कटाऊट हो बैलगाडीचा! अगदी हुबेहूब काढलंय चित्र. मागे त्या उमेदवाराचा फोटोही लावलाय भव्य आकारात! मागचं सगळं झाकून टाकलंय यांनी.

संबंधित बातम्या

हो, यंदा तो कँडिडेट जोरात आहे. प्रत्येक मतदात्याला एकेक बैल घरपोच करणार आहे म्हणे तो, जिंकून आल्यावर!
ते जिंकायचे तेव्हा जिंकूदेत. मी पुढे कोणता रस्ता धरू, ते सांगा ना! इथे चहूकडे प्रगती, विकास, सोनेरी पहाट, उज्ज्वल उद्या वगैरेचं रान माजलंय; पण मला तर आजच यायचंय ना!

मग, एक खात्रीचा उपाय सांगतो. पुढे एक जुना पिंपळपार आहे. लँडमार्क! तो चुकणार नाही. त्याच्या उजवीकडे तीस अंशात जी गल्ली जाते ती पकडा. थेट आमच्या सोसायटीत येईल.

जोशींनी खात्रीने सांगितलं, तरी देशपांडे गोंधळलेलेच! कारण, तो पार तर सर्वांनाच पार चकवणारा केला होता तिथल्या उमेदवाराने! नाना रंग फासलेले, झेंडे खोचलेले, पताका टांगलेल्या आणि वरती भलं मोठं पोस्टर. पिंपळपानाचा मान! देशाची शान!!

आसपास असंख्य प्लास्टिकची पिंपळपानं टाकलेली. पिंपळपान हे निवडणुकीचं चिन्ह होतं त्याचं. तिथल्या भीषण सजावटीतून उजवीकडची, तीही 30 अंशातली बारकी गल्ली दिसतही नव्हती. एकूण काय, तर रस्त्यांची, गल्यांची नावं, दुकानांवरच्या पाट्या, विजेचे खांब, जुन्या जाहिराती, डाव्या-उजव्या खुणा अशा प्रत्येक उघड्या जागेवर कोणा ना कोणा उमेदवाराची नावं, चिन्हं, कर्तबगारी, भविष्याचे दावे वगैरे ऐवज लटकलेला होता. त्यातून नेमकी जोशींच्या सहनिवासाची वाट शोधताना देशपांड्यांचा दम निघाला होता.
शेवटी गेल्या गेल्या ते जोशींना म्हणाले, माझं झालं ते झालं; पण यापुढे इथे येणार्‍यांना नीट पत्ता सांगत चला हो!

नीट म्हणजे? म्हणजे असा की, बुवा स्टेशनच्या बाहेर पडलात की आधी विकासापर्यंत सरळ जायचं. मग, वाकडी काठी धरायची, मग बैलगाडीतून पिंपळपानं शोधायची, तोवर पत्ता सापडेल आपोआप. निवडणुका होईस्तोवर.

हाच न्यू नॉर्मल पत्ता समजा!

जोशी ओशाळं हसले; पण मनात खूश होते. आपल्याकडे येणार्‍या सगळ्या वाटा प्रचारसाहित्यामुळे बेंगरूळ, कुरूप दिसत असल्या, तरी त्या विकासाच्याच वाटा आहेत, हे काय कमी?

-झटका

Back to top button