तडका : धुरांच्या रेषा हवेत काढी… | पुढारी

तडका : धुरांच्या रेषा हवेत काढी...

फलाटावर भरपूर गर्दी होती. रेल्वे गाड्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे धावत होत्या. गाडी पकडण्याची किंवा गाडीत चढण्याची प्रवाशांची लगबग सुरू होती. तिकीट काढणे, जिने चढणे, उतरणे, डब्यात प्रवेश करणे आणि त्यानंतर मिळाल्यास जागेवर बसणे अन्यथा उभे राहून प्रवास करणे यासाठी एकच लगबग सुरू होती. भव्य अशा रेल्वे स्टेशनवरच्या दहा-बारा प्लॅटफॉर्मवर हाच सीन होता. त्याच वेळी एक ‘इंजिन’ मात्र एकटेच खिन्नपणे उभे होते. ‘इंजिन’ हलेल म्हणून गेले वर्षभर कार्यकर्ते वाट पाहत होते. मीडिया आणि जनतेची उत्सुकता ताणली गेली होती की, ‘इंजिन’ नेमके कोणत्या ट्रॅकवर येणार? परंतु, इंजिन काही ट्रॅक वर आले नाही. रेल्वे इंजिनाने आपल्याच जागेवर स्थिर उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि मग ‘इंजिन’च्या पाठीराख्या कार्यकर्त्यांत चलबिचल सुरू झाली. नेमके काय सुरू आहे आणि आपण काय करायचे आहे, याचा गोंधळ रेल्वे इंजिनाने काही संपवला नाही.

तसे इंजिनाच्या आवाजाच्या मोहात असणारे असंख्य ट्रॅक आणि इतर रेल्वे गाड्या त्याला आपल्याकडे येण्याची विनंती करत होते. काहीतरी करून ‘इंजिन’ आपल्याकडे यावे अशी त्यांची इच्छा होती; परंतु आपण कुठे जावे अशी स्वतःची इच्छा नसेल तर कोण काय करणार? बहुपक्षीय गलबला सुरू असताना इंजिनाचे कार्यकर्ते मात्र हतबल झाले होते. आपले राजकारण संपते की काय, असे त्या कार्यकर्त्यांना वाटत होते; परंतु इंजिनाच्या आवाजावर विश्वास ठेवून हे कार्यकर्ते हातावर हात ठेवून बसले होते. असे किती काळ बसणार? स्वतःच्या राजकीय कारकिर्दीसाठी प्रत्येकाला हालचाल करणे आवश्यक असते अन्यथा राजकारणाच्या खेळातून तुम्ही बाहेर फेकले जाता. ‘इंजिन’ आज बोलेल, उद्या बोलेल म्हणता म्हणता इंजिनाने एकदाचा फुत्कार टाकला.

पूर्वी ‘इंजिन’ नवीन होते तेव्हा त्याला चांगले दिवस आले होते. इतर प्रवाशांनाही इंजिनाच्या मागे डबे लागतील आणि त्यामध्ये आपल्याला सुखद प्रवास करता येईल, अशी अपेक्षा होती. ‘इंजिन’ फलाटावर आलेसुद्धा, लोकही सज्ज झाले; परंतु ‘इंजिन’ काही जागेवरून हलले नाही.

संबंधित बातम्या

तिकडे इंजिनाची भावकी हातात मशाल घेऊन इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मुक्त संचार करत होती. बरेचदा लोक म्हणायचे की, मशाल विझलेली आहे, नुसता धूर निघत आहे, त्याची पर्वा न करता भावकी इंजिनाच्या आजूबाजूला धुरकटलेली मशाल घेऊन फिरत असायची. ‘इंजिन’ त्याकडे दुर्लक्ष करत असे. कारण, त्याला माहीत होते की, एकदा आपण निघालो तर ट्रॅकवर कोणीही आले, तरी चिरडून निघणार आहे; पण इंजिन जागेवरून हलले नाही, तर ते चिरडणार तरी कोणाला आणि जाणार तरी पुढे कसे? हा एक मोठाच प्रश्न होता. दरम्यान, ‘इंजिन’ रातोरात दिल्लीला पण जाऊन आले. दिल्लीच्या मोठ्या वर्कशॉपमध्ये त्याची सर्व्हिसिंग पण झाली. शेवटी एकदाची इंजिनामध्ये हालचाल झाली. फुस्स आवाज आला आणि शिट्टी पण वाजली. शिट्टी वाजल्याबरोबर कार्यकर्ते सज्ज झाले आणि आता काहीतरी आदेश येणार म्हणून वाट पाहू लागले. परंतु, याही वेळी इंजिनाने कार्यकर्त्यांची निराशा केली आणि जागेवरच उभे राहून दुसर्‍या एका मोठ्या रणगाड्याला पाठिंबा जाहीर केला.

Back to top button