तडका : हे सारे तुमच्यासाठी! | पुढारी

तडका : हे सारे तुमच्यासाठी!

मतदार बंधू-भगिनींनो, आज जो काही निवडणुकीचा गदारोळ सुरू आहे, तो केवळ तुमच्यासाठी आहे, हे आधी समजून घ्या. आम्हाला काय करायचे आहे? आम्ही तुमचे केवळ सेवक आहोत. हे आमचे मोठे बंगले, कोट्यवधीची प्रॉपर्टी, शिवाय आमच्या मुलाबाळांचा राजकीय प्रवेश यात स्वतःचा काही स्वार्थ नाही. हे केवळ तुमच्यासाठी सुरू आहे. आता हेच पाहा ना, सध्या महाराष्ट्रातील किमान दहा मतदारसंघांत तरी असे म्हणणारे उमेदवार उभे आहेत, जे म्हणतात की, जनतेची इच्छा आहे म्हणून उभे आहोत. तुम्ही-आम्ही सर्व म्हणजे मतदार. आमची काही व्यक्तिगत इच्छा राहिलेली नाही. याचा अर्थ हे जे काय राजकारण सुरू आहे आणि खासदारकी मिळवण्यासाठी नेटाचे जे प्रयत्न आहेत, हे काही आम्हाला खासदार व्हायला मिळावे म्हणून नाही, तर तुमची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून आहे.

समजा, एखाद्या इच्छुक उमेदवाराला त्याच्या पक्षाने तिकीट दिले नाही तर तो तत्काळ गाडी काढतो आणि विरोधी पक्षाच्या कार्यालयात जाऊन हातात काहीतरी बांधून घेतो आणि उमेदवारी जाहीर करतो. आता तुम्ही म्हणाल, इथे तत्त्वाचा काही विषय आहे का? विचारांचा काही विषय आहे का? तर अजिबात तसे काही नसते. केवळ तुमची सेवा करायला मिळावी म्हणून हा आटापिटा सुरू आहे. जनतेची इच्छा आहे म्हणून आम्ही राजकारण करतोय, हे तुमच्या लक्षातच येत नाही. तुम्हाला असे वाटते की, नेता आणि त्याच्याभोवतीचे शंभर-दोनशे कार्यकर्ते आणि पुढील तीन पिढ्यंची सोय लावण्यासाठी हे सुरू आहे. तुमच्या मनात असे विचार येत असतील तर ते निखालस चूक आहे. हे केवळ आणि केवळ तुमच्यासाठीच सुरू आहे.

किती बरे ती समाजसेवेची तळमळ आणि जनतेप्रती असलेली श्रद्धा? इतकी तळमळ अमेरिका, इंग्लंड, जर्मनी इत्यादी प्रगत राष्ट्रांमध्येही दिसून येत नाही, ती आपल्या देशामध्ये जरूर दिसून येते, याचा आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे. एक-दोन वॉर्डांमध्ये काहीतरी काम केलेला नगरसेवकसुद्धा जनतेच्या सेवेसाठी खासदार व्हायला तयार आहे. आता तुम्ही म्हणाल, समजा, या वेळेला पराभूत झाला तर पुढे काय? अजिबात काळजी करू नका. लोकसेवेचा घेतलेला वसा असा एका पराभवामुळे आम्ही सोडून देतो की काय? छे, छे. लोकसभा गेली म्हणजे लोकशाही संपली असे नाही. समजा, लोकसभेला पाच पंचवीस कोटी रुपये खर्च करून यश आले नाही, तर अवघ्या सहा महिन्यांत येणार्‍या विधानसभेला आम्ही पुन्हा निवडून येण्याचा प्रयत्न करू. काय म्हणताय? हे सगळे पदासाठी सुरू आहे? हे सर्व तुमची सेवा करायला मिळावी म्हणून सुरू आहे.

संबंधित बातम्या

‘जनतेची इच्छा आहे म्हणून’ हा एक नवीन प्रयोग या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत आहे. ‘कार्यकर्त्यांचा आग्रह’ हा एक दुसरा फॉर्म्युुला आहे. हे कार्यकर्ते कोण, तर जे आमदार-खासदार यांच्याभोवती असतात ते लोक. तेच हो, जे नाही का इच्छुक उमेदवाराच्या भोवती गाड्या घेऊन तयार असतात? 200 गाड्या घेऊन मुंबईला नेत्याच्या बंगल्यावर धडकणारे उमेदवारही आहेत. म्हणजे 200 गाड्यांत आलेले दीड हजार कार्यकर्ते आपल्या नेत्याचे शक्तिप्रदर्शन करत असतात.

Back to top button