तडका : आश्वासनांची खैरात | पुढारी

तडका : आश्वासनांची खैरात

निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यात विशेषत्वाने उमेदवारी जाहीर झाली की, प्रत्येक उमेदवाराला खासदार होऊन दिल्लीला संसदेमध्ये जाण्याची ओढ लागलेली असते. कोणतीच निवडणूक कुणासाठीही कधीच सोपी नसते. कार्यकर्ते सांभाळायला लागतात, नेते सांभाळावे लागतात, सभा ठेवली तर गर्दी जमावावी लागते, प्रचंड पैसे खर्च करावे लागतात. एकंदरीत ही यंत्रणा राबवणे अवघड असेच आहे. मतदार हा निवडणुकीतील अत्यंत महत्त्वाचा कळीचा घटक आहे. त्यामुळे त्याला भुलवण्यासाठी, आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली जातात. काय प्रलोभने दाखवतील, याचा काही नेम नाही.

आता हेच पाहा ना, माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यासंबंधी वचन दिले आहे. बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकर्‍यांचे प्रश्न असतील, महिलांचे, पाणीपुरवठ्याचे, रस्त्यांचे, मूलभूत सुविधांचे, हे सगळे प्रश्न सोडवण्याबरोबरच ग्रामीण भागातील ज्या युवकांचे लग्न होत नाही, त्यांचे लग्नही लावून देण्याची हमी या महोदयांनी घेतली आहे. ग्रामीण भागामध्ये तरुण मुलांचे लग्न न होण्याची अनेक कारणे आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात गावागावांत पाहिले तर 50 ते 100 तरी तरुण असे असतात की, ज्यांचे लग्नाचे वय उलटून जात आहे; परंतु त्यांना लग्नासाठी वधू मिळत नाही. हा एक मोठा सामाजिक प्रश्न असल्याचे ओळखून सदरहू उमेदवार श्रीमान बारस्कर यांनी थेट या युवकांनाच विवाहित करून देण्याचे आश्वासन दिलेले आहे.

ज्यांचे विवाह जुळत नाहीत, त्यांचे विवाह सदर उमेदवार हा खासदार झाल्यानंतर कशा पद्धतीने जुळवणार, याविषयी कुठलीही स्पष्टता नाही. बहुतेक वधू-वर सूचक मंडळ तयार करून ‘जोड्या जुळवा’चा कार्यक्रम करण्याचा मानस असावा, असे वाटते; पण मतदारांना प्रलोभन दाखवताना किंवा आश्वासन देताना काय असावे, यामध्ये लग्न जुळवून देण्याचे आश्वासन ही कल्पकताच म्हणावी लागेल. यामुळे प्रत्येक गावात काही नाही तरी किमान 50 तरी अविवाहित तरुणांची मते मिळतील आणि या अविवाहित तरुणांचे लग्न होणार असेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यही या उमेदवाराला उत्साहाने मतदान करतील, अशी शक्यता आहे.

संबंधित बातम्या

आपल्या लग्नाची धूसर होत असलेली शक्यता या आश्वासनामुळे व पूर्ण झाल्यास स्वप्नाची परिपूर्ती होईल या भावनेने अविवाहित मतदार भारावून गेले आहेत की काय, याविषयी काही माहिती मिळत नाही; परंतु ते निश्चितच भारावून गेले असतील, यात शंका नाही. आपले लग्न जुळवून आणण्याचे जे कार्य आपले सगेसोयरे, कुटुंबीय आणि गावकरी करू शकले नाहीत, ते कार्य निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार करू शकतो, अशी आशा त्यांच्या मनात निश्चितच निर्माण झाली असेल. अशा उमेदवाराच्या प्रचारासाठी विवाहेच्छुक मतदारांचा ताफा बाहेर पडला तर आश्चर्य वाटू देऊ नका. प्रत्येक तरुणाला आपला विवाह लवकर व्हावा, असे वाटत असते; परंतु इच्छुक तरुणी समोर येत नाहीत, कारण ग्रामीण भागात राहण्याची कुणाची इच्छा नाही आणि शेतकर्‍याशी लग्न करण्याची कुणाची तयारी नाही. अशा तरुणांना आशेचा किरण लोकसभा उमेदवारामध्ये दिसला, तर सोन्याहून पिवळे म्हणावे लागेल.

Back to top button